पुण्यातील अघोरी प्रथेच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल; तातडीने कारवाई करण्याचे आदेश

पुण्यातील अघोरी प्रथेच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल; तातडीने कारवाई करण्याचे आदेश

पुणे, पुढारी ऑनलाईन: महिला आयोगाने पुण्यातील धायरी परिसरातील जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची दखल घेतली आहे. तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

"पुण्यात मूलबाळ होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला होता. जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार अतिशय निंदनीय आणि अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने कार्यवाही करून आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत," असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

नेमकं काय घडलं होतं

जागतिक दर्जाचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं या साठी नवऱ्यासह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात हा प्रकार घडला होता. पत्नीला पती तसेच घरातील इतर सर्वजण संगनमत करुन शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. तसेच वारंवार मारहाण करुन शिवीगाळही करायचे. पुण्यातील धायरी भागात हा प्रकार 2019 पासून सुरु होता. सदर पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या सासरच्या कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news