काळोखात खोल दरीत अडकलेले ते दोघे….. आणि पोलिसांच्या मदतीने रंगला सुटकेचा थरार , वाचा सविस्तर

काळोखात खोल दरीत अडकलेले ते दोघे….. आणि पोलिसांच्या मदतीने रंगला सुटकेचा थरार , वाचा सविस्तर
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  माळशेज घाट जवळील हरिश्चंद्रगडावर (ता. जुन्नर) ट्रेकिंगसाठी गेलेले पुण्यातील दोन युवक रात्रीच्या भयाण काळोखात रस्ता चुकल्याने किर्रर्र दाट झाडी असलेल्या आणि श्वापदांच्या तावडीतून तसेच खोल दरीतून सहीसलामत बाहेर काढण्यास ओतूर पोलिसांना यश आले आहे. अनिकेत संजय देशमुख व अर्जुन सुनील काकडे (दोघेही रा. धनकवडी पुणे) असे युवकांचे नाव आहे. हे दोघे ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगडावर गुरुवारी (ता. १३) गेले होते. त्यांनी त्या दिवशी गडावर मुक्काम केला व दुसरे दिवशी त्यांना पुणे येथे जायचे असल्याने ते व्हाया टोलार खिंड, खीरेश्वर मार्गे पुणे येथे जाण्यासाठी निघाले असता जंग लातील वाट चुकले. त्यावेळी सायंकाळचे ७ वाजले होते जस जसा काळोख पसरत गेला तसतशी दोघांनाही धडकी भरत गेली.

श्वापदांच्या भीतीने दोघेही भयभीत झाले. अशा परिस्थितीत त्यांनी पुणे ग्रामीण कंट्रोल रूम ११२ ला कॉल केला आणि कोणतीही रेंज नसलेल्या परिसरात तो कॉल अपघातानेच लागला. या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी तात्काळ निर्णय घेत परिसराची माहिती असलेले पोलीस नाईक नदीम तडवी, संदीप लांडे तसेच होमगार्ड आशिष क्षीरसागर यांच्यासह अत्यंत तातडीने घटनास्थळ गाठले व ट्रेकर्सची शोध मोहीम सुरू केली. घटनक्रमाची माहिती घेऊन कॉलर यांचे लोकेशन तसेच आजूबाजूचे परिस्थितीची माहिती ते कॉलरकडून घेण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु कॉलर यांचा मोबाईल बंद झाल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती.

त्यानंतर  खीरेश्वर ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. शोध मोहीम चालू असताना पोलीस टीम टोलार खिंड येथे पोचली. पोलिसांनी भयाण काळोखात मोठमोठ्याने आरोळ्या दिल्या असता एका दरीतून माणसांचे आवाज आल्याने टीम त्या दिशेने दरीत पोहचली. उपरोक्त दोन्ही ट्रेकर्स हे दरीत एका थोरल्या खडकावर रात्री २ वाजता अंधारात बसलेले मिळून आले. यावेळी ट्रेकर्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुःख व आनंदाचा मिलाप त्यांचे चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दोन्ही पुणेकरांनी भरलेल्या डोळ्यांनी ओतूर पोलीसांचे व खीरेश्वर ग्रामस्थांचे हृदयापासून आभार मानले. या घटनेत आपल्याही जीवाची पर्वा न करता ओतूर पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news