पुणे: कसब्यात येऊन येऊन येणार कोण ?

पुणे: कसब्यात येऊन येऊन येणार कोण ?

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मी पंधरा हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा आत्मविश्वासपूर्ण दावा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी दै. 'पुढारी'शी बोलताना केला. सदाशिव, नारायण, शनिवार या पेठांचा समावेश असलेल्या शनिवार-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे वर्चस्व असून हा भाग महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाला मोठे मताधिक्य मिळवून देतो. त्या भागातील मताधिक्याबद्दल धंगेकर यांना विचारले असता त्या भागातही मला बरीच मते मिळतील, असे सांगितले. येथील मतदारही माझ्यावर विश्वास टाकतील, असा दावा त्यांनी केला. तोच निवडणुकीचा निकाल ठरविणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, या प्रभागात 37 हजार मतदान झाले असून, तेथे मला पंधरा हजारांपर्यंत मते मिळतील.

नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ मधील दत्तवाडी, राजेंद्रनगर तसेच इतर भागांतही आपल्यालाच मताधिक्य मिळेल, असा दावा भाजप करीत आहे. त्याबाबत धंगेकर म्हणाले की, भाजपने प्रभाग १५ मध्ये जरी पंधरा-वीस हजारांचे मताधिक्य घेतले आणि २९ मध्येही दोन हजारांचे मताधिक्य घेतले, जरी मला मताधिक्य मिळाले नाही, तरी पुण्याच्या पूर्वभागांतील कसबा-सोमवार पेठ हा प्रभाग क्रमांक १६, रास्ता पेठ-रविवार पेठ हा प्रभाग क्रमांक १७, खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ हा प्रभाग क्रमांक १८ आणि लोहियानगर-कासेवाडी हा प्रभाग क्रमांक १९ माझ्यामागे उभा राहील.

सदाशिव-शनिवार-नारायण या पेठांमधील तसेच नवी पेठ-पर्वतीमधील भाजपचे मताधिक्य तोडण्याएवढी मते मला मिळतील. मी नगरसेवक होतो, त्या प्रभाग 16 (कसबा पेठ) मध्ये मी सुमारे आठ हजारांची, तसेच प्रभाग 17 (नाना पेठ, गणेश पेठ) मध्ये आठ हजार मतांची आघाडी घेईन. त्यामुळे भाजपच्या मताधिक्याची बरोबरी करीन. प्रभाग 18 (खडकमाळ आळी, मोमीनपुरा. गुरुवार पेठ)मध्ये सुमारे सहा हजार मतांचे, तसेच प्रभाग 19 (लोहियानगर) मध्ये सुमारे दोन हजार मताधिक्य मी घेईन. पूर्वभागातील पेठांमध्ये मी भाजपवर मोठे मताधिक्य मिळवीन. त्याआधारे माझा विजय निश्चित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news