नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लैंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले खासदार बृजभूषण सिंह यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तूर्तास नकार दिला. आपण निर्दोष आहे आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. (Brij Bhushan Sharan Singh)
शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बृजभूषण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र मी काही गुन्हेगार नाही. जर मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ मी कुस्तीपटूंचे आरोप मान्य केले असे होईल. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने तीन सदस्यांची समिती नेमली आहे. येत्या 45 दिवसांत निवडणुका होतील. निवडणुकानंतर माझा कार्यकाळ संपुष्टात येईल. (Brij Bhushan Sharan Singh)
बृजभूषण पुढे म्हणाले की, 'प्रत्येक दिवशी हे कुस्तीपटू एक वेगळी मागणी घेऊन येत आहेत. त्यांनी एफआयआरची मागणी केली, एफआयआर दाखल झाली. आता ते मला जेलमध्ये पाठवा आणि राजीनामा घ्या, अशी मागणी करत आहेत. मी माझ्या मतदार संघातील लोकांमुळे खासदार आहे. विनेश फोगटमुळे मी खासदार झालो नाही. सध्या फक्त एक कुटुंब आणि आखाडा आंदोलन करत आहे. हरियाणातील 90 टक्के कुस्तीपटू माझ्या बाजूने आहेत.'
या आंदोलनापूर्वी ते माझे गुणगान करत होते, त्यांच्या लग्नसमारंभात बोलवत होते. माझ्यासोबत फोटो काढत होते. माझे आशीर्वाद घेत होते. त्यांनी 12 वर्षे कोणत्याही पोलिस ठाण्यात, क्रीडा मंत्रालयाकडे किंवा फेडरेशनकडे लैंगिक अत्याचाराची तक्रार केली नव्हती.
हेही वाचा;