पुढारी ऑनलाईन डेस्क : नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.२७) मतमोजणी सुरू आहे. ६० मतदारसंघात एकूण १८३ उमेदवार निवडणूक मतमोजणीच्या रिंगणात आहेत. राज्यात जवळपास सर्वच सामाजिक प्रश्नांवर महिला नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत. परंतु, गेल्या ६० वर्षात नागालँडला एकही महिला आमदार नव्हती. पण या विधानसभा निवडणुकीत चार महिला रिंगणात होत्या. त्यापैकी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एनडीपीच्या उमेदवार हेकानी जाखलू दिमापूर-३ मधून विजयी झाल्या आहेत. त्यांच्या निवडणुक विजयाने तब्बल ६० वर्षानंतर नागालँडला पहिली महिला आमदार मिळाली आहे. हेकानी जाखलू यांच्या विजयाने नागालँडचा नवीन इतिहास रचला आहे.
नागालँडमध्ये एकूण १३,१७६३२ मतदार आहेत, त्यापैकी महिला मतदारांची संख्या ६, ५६, १४३ म्हणजेच ४९.८ टक्के आहे. राज्यात एकूण १८३ उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी चार महिला होत्या. त्यामुळे आत्तापर्यंत एकही महिला नसलेल्या नागालँडला पहिली महिला आमदार मिळाली आहे. त्यामुळे महिला आमदारासाठी आणखी पुढचे पाच वर्षे वाट पाहावी लागणारी चिंता आता मिटली आहे.
भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपीचे हेकानी जाखलू दिमापूर-३ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नागालँड विधानसभा निवडणूक लढवलेल्या एकूण १८३ उमेदवारांपैकी एका ४८ वर्षीय या वकील महिला कार्यकर्तीचा समावेश होता. जाखलू यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या अझेतो झिमोमी यांचा पराभव करत, १५३६ मतांनी विजय मिळवला आहे. एनडीपीपीच्या आणखी एक महिला उमेदवार सल्हौतुओनुओ क्रुसे या पश्चिम अंगामी जागेवर आघाडीवर आहेत.
नागालँड राज्य स्थापन होवून ६० वर्षे झाली आहेत. मात्र आजपर्यंत राज्यात महिला आमदार नाही. यावेळी भाजपने एक, एनडीपीपीने दोन आणि काँग्रेसच्या वतीने एक महिला उमेदवार रिंगणात होत्या. या उमेदवारांमध्ये दिमापूर मतदारसंघासाठी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेखनी जाखलू, टेनिंग मतदारसंघातून काँग्रेसच्या रोझी थॉम्पसन, पश्चिम अंगामी विधानसभा मतदारसंघातून NDPP च्या सलहौतुओनुओ आणि अटोइजू मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काहुली सेमा रिंगणात होत्या.
नागालँडच्या पहिल्या महिला आमदार हेकानी या ४८ वर्षीय एनडीपीपी नेत्या आहेत त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी २०१३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ लॉमधून लॉ ची मास्टर्स पदवी मिळवली आहे. हेकानी यांच्याकडे ५.५८ कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःवर ४१.९५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचेही जाहीर केले आहे.
नागालँडला १९६३ मध्ये राज्याचा दर्जा मिळाल्यापासून ६० सदस्यीय सभागृहात एकही महिला आमदार निवडून आलेला न्हवती. गेल्यावर्षी, एस फांगनॉन कोन्याक (राज्यसभा सदस्य) यांनी या ईशान्येकडील राज्यातून पहिल्या महिला खासदार (खासदार) बनून इतिहास घडवला होता.