वॉशिंग्टन : 'मेटा'चे सीईओ मार्क झुकेरबर्ग पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात असे म्हटले जात आहे. कंपनीच्या सातत्याने अपयशी ठरत असलेल्या प्रोजेक्टमुळे मोठ्या प्रमाणात बदलाची तयारी केली जात आहे. अर्थात मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याबाबतचे वृत्त 'मेटा'च्या प्रवक्त्याने फेटाळले आहे.
'मेटा'चे सीईओ झुकेरबर्ग यांनी अलीकडेच 11 हजार कर्मचार्यांना नोकरीतून काढले आहे. या कपातीबाबत त्यांनी माफीही मागितली होती व आता खुद्द झुकेरबर्गच राजीनामा देणार असल्याचे वृत्त आले आहे. एका रिपोर्टनुसार झुकेरबर्ग 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात. 'मेटा'चे कम्युनिकेशन हेड अँडी स्टोन यांनी मात्र हा रिपोर्ट म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
'द लीक' नावाच्या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये झुकेरबर्ग कंपनी सोडणार असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की झुकेरबर्ग यांनी 'मेटावर्स' प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च केला; पण अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. झुकेरबर्ग यांच्या 'व्हीआर' प्रोजेक्टलाही बाजारातून खास प्रतिसाद मिळाला नाही. गेल्याच महिन्यात अर्थविश्वाशी संबंधित आलेल्या एका वृत्तानुसार 'मेटा'चे गुंतवणूकदारही आता झुकेरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवण्यास कचरत आहेत. 'मेटा'मध्ये गुंतवणूक करणार्यांची संख्या आता दुपटीपेक्षाही अधिक घटली आहे. मेटावर्ससारखे प्रोजेक्ट अपयशी ठरल्याने व गुंतवणूकदार सोडून जात असल्याने त्याची जबाबदारी झुकेरबर्ग स्वतः घेऊ शकतात. मेटावर्समुळे 'मेटा'चा स्टॉक 70 टक्क्यांहून अधिक घटला आहे. अर्थात झुकेरबर्ग यांचा राजीनामा हा केवळ एक प्रसिद्धी स्टंटही असू शकतो असे म्हटले जात आहे.