नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीचा इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजाला राष्ट्रीय संघातून वगळून बरेच दिवस झाले; परंतु तो आयपीएलमधील आपल्या कामगिरीने राष्ट्रीय संघात परतण्याचा पुन्हा दावेदार बनला आहे. (Ishant Sharma)
इशांत शर्माबाबत टीम इंडियाची धारणा वेगळी आहे. निवडकर्ते त्याला कसोटीसाठी तंदुरुस्त मानत नाहीत, तसेच संघ निवडीदरम्यान त्याच्या नावाची चर्चाही होत नाही. अशा स्थितीत आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा तरी संपुष्टात आली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी तो टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. त्याच्या चेंडूंमध्ये अजूनही तितकीच ताकद आहे, जी त्याला भारतासाठी पुन्हा खेळवू शकते. (Ishant Sharma)
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव पाहत होता, पण त्यांच्याकडे इशांत शर्मा नावाचा भारतीय क्रिकेट संघाचा एक हुकमी एक्का होता आणि त्यांनी या खेळाडूला संघात घेताच दिल्लीच्या संघाची ताकद कैकपटीने वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याच्यामुळे संघाची गोलंदाजी बाजू अधिक मजबूत झाली.
आयपीएल 2023 इशांतने समीक्षकांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यांत 10 विकेटस् घेतल्या आहेत; परंतु या कालावधीत त्याचा इकॉनॉमी रेट 8.24 आहे, जो चेन्नईचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे (9.79) आणि 19 विकेटस् घेणारा अर्शदीप सिंग (9.67) यांच्यापेक्षा खूपच चांगला आहे. धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात इशांतने शेवटचे षटक टाकून संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचे षटक टाकताना संघाने 5 धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा;