पुढारी ऑनलाईन : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमधील संबंधांशी परिचित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने 'रॉयटर्स'ने हे वृत्त दिले आहे. पुढील आठवड्यात भारतातील दिल्ली शहरात 'G20 शिखर परिषद' (G20 summit in India) होणार आहे.
यापूर्वी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी चीनने त्यांच्या देशाच्या सीमा अधोरेखित करत अक्साई चीनसह भारताच्या अरुणाचल प्रदेशवर देखील आपला दावा केला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दिल्लीतील परिषदेला हजर राहणार नसल्याची मोठी घडामोड आहे, असे अनेक माध्यमांनी म्हटले आहे.
रॉयटर्सने म्हटले आहे की, दोन भारतीय अधिकारी, एक चीनमधील मुत्सद्दी आणि एक अन्य G20 देशाच्या सरकारसाठी काम करणार्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथे सप्टेंबर ९ आणि सप्टेंबर १० च्या G20 बैठकीत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ऐवजी प्रीमियर ली कियांग बीजिंगचे प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. परंतु भारतीय आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणतेही स्पष्टीकरण (G20 summit in India) दिलेले नाही.
गेल्या नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G20 परिषदेला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. दरम्यान त्यांनी ज्यो बायडेन यांची शेवटची भेट घेतली होती. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिल्लीत होणाऱ्या G20 परिषदेला हजर राहणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यांच्या ऐवजी रशियाकडून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह हे परिषदेला उपस्थित (G20 summit in India) राहणार आहेत.