बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात फक्त हे त्यांना आणि ते यांना गद्दार म्हणत आहेत, दोघांनी एकमेकांना गद्दार म्हटल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे ते सभेत बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ऊस उत्पादकांचे प्रश्न आहेत. साखरेचा कोटा बंद करू नका, हे सांगायला कोणी तयार नाही. वेदांतासारखा महत्त्वाचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला, त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. फक्त हे त्यांना आणि ते यांना गद्दार म्हणत आहेत. दोघे एकमेकांना गद्दार म्हणून प्रश्न सुटतील का. अडचणी सुटतील का, याचा कुठे तरी अंतर्मुख होऊन विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकशाहीचा राज्यात खेळखंडोबा चालवला आहे. कोणी काही करतेय, कशीही माणसं फोडली जात आहेत. स्थिरताच राहिलेली नाही. त्यात अधिकाऱ्यांचे मरण होत आहे. अधिकाऱ्यांना कळेना की सत्तेतला माणूस तिथे किती दिवस बसेल. नेमकं कोणाचं ऐकायचं. अधिकाऱ्यांना वाटते आहे की, सत्तेत असणाऱ्यांचे ऐकावे तर उद्या दुसरी मंडळी खुर्चीवर आली तर कसे व्हायचे? या सगळ्यात अधिकारी वर्गाची मोठी कसरत सुरु आहे. यातून विकासाला मोठी अडचण निर्माण झाली आहे.
फक्त आकडा लागला पाहिजे
पवार यांच्या भाषणावेळी तुमच्याकडेच पुन्हा सत्तेची सूत्रे येतील, असे एका कार्यकर्त्याने म्हटले. त्याचा धागा पकडत पवार म्हणाले, अरे आम्ही येवू. पण त्यासाठी आकडा पक्का लागला पाहिजे. १४५ आकडा गाठला पाहिजे. मी बहुमताच्या आकड्याविषयी बोलतोय, मटक्याच्या नव्हे, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत.
आम्ही गद्दारी करून आलेलो नाही
सत्ताधारी मंडळी सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे सांगत आहेत. परंतु तेथे सर्वसामान्यांसाठी काही केलेले दिसेना. दसऱ्याच्या मेळाव्याला ते म्हटले की माणसं आपणहून आली होती. मग खुर्च्या मोकळ्या का झाल्या असा सवाल पवार यांनी केला. माझ्या सोमेश्वरच्या सभेत शेवटच्या रांगेतील एकसुद्धा माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करून आलेलो नाही, असेही पवार म्हणाले.