पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा यशस्वी दौरा संपवून टीम इंडिया पुढच्या मिशनसाठी विंडीज दौ-यावर पोहचली आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना आज 22 जुलै रोजी खेळला जाणार आहे. पण सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार रवींद्र जडेजाच्या संघातील स्थानाबाबत शंका निर्माण झाली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. टी-20 मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. तरी, जडेजा अनुपस्थितीत टीम इंडियाचे उपकर्णधार पद युझवेंद्र चहलकडे सोपवले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
चहल सध्या टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताच्या फिरकी आक्रमणाचे नेतृत्व केले आहे. शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शुक्रवारी 22 जुलैला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्यास सुरुवात होणार आहे.