उन्हाळ्यात का वाढते चक्कर येण्याची समस्या?

चक्कर येण्याची समस्या
चक्कर येण्याची समस्या
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशभरात सध्या कडक उन्हाळ्याने कहर केला आहे. अशा वाढलेल्या तापमानाचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चक्कर येण्यासारखे प्रकार अनेक वेळा घडतात. त्यामागे कोणती कारणे आहेत व ती कशी टाळावीत हे जाणून घेणे महत्वाचे ठरते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी यापूर्वीच म्हटलेले आहे की सध्याच्या काळात दिवसाचे कडक ऊन टाळणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या लोकांना आधीपासूनच एखादा क्रोनिक आजार आहे, ज्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकाराचा समावेश होतो, अशा लोकांनी या काळात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. उष्णतेमुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यात अनेकांना चक्कर येत असते. ज्यावेळी शरीराचे तापमान वाढते त्यावेळी अशा घटना घडतात.

कडक उन्हाळ्यात घराबाहेर राहणार्‍या, उन्हात काम करणार्‍या किंवा उन्हाळ्यात खेळ-व्यायाम करणार्‍यांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण अधिक असते. काही लोकांना गरम झालेल्या कारमध्ये किंवा जिथे तापमान वाढले आहे अशा रूममध्येही चक्कर येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की उन्हाळ्यात अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याने चक्कर येणे, थकवा आणि बेशुद्ध होण्यासारख्या घटना घडू शकतात. शरीराचे डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. शरीरातील पाणी घामाच्या रूपाने बाहेर पडते आणि त्या प्रमाणात जर आपण पाण्याचे सेवन केले नाही तर ही समस्या उद्भवते.

अचानकपणे थंड ठिकाणाहून उष्ण ठिकाणात किंवा उष्ण ठिकाणातून थंड ठिकाणी गेल्यावर शरीराच्या तापमानात बदल होऊनही चक्कर येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच फळे व भाज्यांचे सेवन अधिक करावे. अत्याधिक प्रमाणात चहा-कॉफीचे सेवन टाळावे. त्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. ओआरएस घेतल्याने लाभ मिळू शकतो. नारळपाणी, लिंबू पाणी अशा पेयांचे सेवन करावे. शक्य होईल तितके उन्हात जाण्याचे टाळावे, विशेषतः दुपारच्या उन्हात जाणे टाळावे. सुती, सैलसर व हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीस चक्कर आली तर त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित होईल यासाठीचे उपाय करावेत. डिहायड्रेशनचा धोका कमी करण्यासाठी पाणी किंवा अन्य पेय पदार्थ द्यावेत. तसेच वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news