Cholesterol : कोलेस्टेरॉलचा वाढता धोका; अशी घ्‍या काळजी

Cholesterol
Cholesterol

न्यूयॉर्कः शरीरात चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते. त्यापैकी 'बॅड' म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका संभवतो. नुकत्याच झालेल्या एका आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 10 पैकी 6 भारतीयांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य आहे. ज्यामध्ये 31 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल सर्वाधिक आढळून आले. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते, कोलेस्टेरॉलची वाढती प्रकरणे लक्षात घेता, अन्नातून काही गोष्टी वगळणे अत्यंत आवश्यक आहे. आज जगभरात कोलेस्टेरॉल आणि परिणामी स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढती धावपळ आणि बैठी जीवनशैली हृदयविकाराचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार आहेत.

'सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन'नुसार, 5 पैकी 2 अमेरिकन प्रौढ व्यक्ती कोलेस्टेरॉलच्या समस्यांसह संघर्ष करतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या संदर्भात तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया. कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. ज्याची शरीराला पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी गरज असते. परंतु, जेव्हा ते शरीरात जास्त प्रमाणात जमा होते तेव्हा समस्या उद्भवते. ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट डॉ. एलिओनोरा अवनाटी यांच्या मते, जास्त जंक फूड खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. रुग्णाला थकवा, धाप लागणे, छातीत दुखणे यासारखी काही लक्षणे दिसल्यास, डॉक्टर शरीरातील कोलेस्टेरॉलची स्थिती तपासण्यासाठी लिपिड पॅनेल टेस्ट करण्याची शिफारस करतात. ज्याद्वारे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी ओळखली जाते.

वाढलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्यायाम करणे आणि खाण्याच्या सवयी बदलणे. अशा परिस्थितीत काही पदार्थांपासून दूर राहिल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फिलाडेल्फियामधील सर्टीफाईड डायटीशियन आणि बी वेल विथ बेथचे मालक बेथ ऑगस्टे यांच्या मते, पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते, जे थेट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवते. आणि जेव्हा खराब कोलेस्टेरॉल तुमच्या लिव्हरकडे जाते तेव्हा ते तुमच्या शरीरातून काही कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास सक्षम असते. पण या सॅच्युरेटेड फॅटमुळे तुमच्या यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे ते खराब कोलेस्टेरॉल तेवढे कमी करू शकत नाही. तुम्ही फुल फॅट डेअरी प्रोडक्ट्समधून लो फॅट डेअरी प्रोडक्ट्सवर स्विच केले पाहिजे. जेणेकरून तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात आणि तुमच्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

डायटिशियन बेथ ऑगस्टे म्हणतात, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांसाठी रेड मिट चांगला पर्याय नाही. त्यात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला खराब कोलेस्टेरॉल बाहेर टाकणे फार कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी त्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश करण्यासाठी, शक्यतो कडधान्ये आणि उच्च प्रथिनेयुक्त धान्यांचा समावेश करा. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. तळलेले पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. पण तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून तुमच्या हृदयाशी संबंधित आजार वाढवू शकतात. त्याऐवजी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, मासे, फ्लेक्स सीड्स, अक्रोड यांसारख्या हेल्दी फॅट्सचे सेवन करा. हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news