PM Modi : जपानचा दौरा विशेष का आहे ? पंतप्रधान मोदींनीच केलं स्पष्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ मे रोजी जपानची राजधानी टोकियोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून या दौऱ्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी म्हटले आहे.
या निवेदनात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी म्हटले आहे की, भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. जपानमधील दुसऱ्या क्वाड लीडर्स समिटमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी होत आहे. यावेळी क्वाडच्या निर्णयांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या विकासावर आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय करणार आहे.
PM Modi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेणार
मोदींनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. जिथे ते युनायटेड स्टेट्ससोबतचे त्यांचे बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा करणार आहेत. प्रादेशिक विकास आणि समकालीन जागतिक मुद्द्यांवर आम्ही आमचा संवाद सुरू ठेवू, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांची भेट घेणार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवनिर्वाचित ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज प्रथमच क्वाड लीडर्स समिटला उपस्थित राहणार आहेत. मी त्यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी उत्सुक आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत बहुआयामी सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
पंतप्रधान मोदी यांनी जपान दौऱ्याचा उद्देश केला स्पष्ट
भारत आणि जपानमधील आर्थिक सहकार्य हा आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा महत्त्वाचा पैलू आहे. पंतप्रधान किशिदा आणि मी पुढील पाच वर्षांत जपानमधून भारतात ५ ट्रिलियन रुपयांची सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक करण्याबाबत मार्चमधील शिखर परिषदेत विचारविनिमय केला होता. त्याचबरोबर वित्तपुरवठा करण्याचा आमचा हेतूही जाहीर केला. आगामी भेटीदरम्यान, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी जपानी व्यावसायिकांची भेट घेणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचलंत का :