पुढारी ऑनलाईन – कोरोना साथीचा उद्रेक होऊन जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. आताची स्थिती पूर्णपणे सामान्य वाटत असली तरी काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जगाने या साथीने घातलेले थैमान अनुभवले आहे. कोरोना रुग्णांची संख्या जगभरात कमी होत आहे, पण तरीही जागतिक आरोग्य संघटनेने साथ संपल्याची घोषणा अजून तरी केलेली नाही. या स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक घेब्रेयसस यांनी मोठे विधान केलेले आहे. (WHO says Covid pandemic not over yet)
घेब्रेयसस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "कोरोनाचा शेवट आपल्याला दिसू लागला आहे. पण शेवट दिसू लागला आहे, याचा अर्थ आपण शेवटाला पोहोचलो आहोत, असा होत नाही." न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधरण सभा सुरू आहे. यावेळी घेब्रेयसस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"जगातील २/३ लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. तसेच ७५ टक्के इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरण झालेले आहे." "आपण गेली अडीच वर्ष इतका दीर्घ कालावधी अंधाऱ्या बोगद्यात घालवला आहे. या बोगद्याच्या अखेरीला असलेल्या प्रकाशाचं ओझरतं दर्शन आपल्याला आता होत आहे," असे ते म्हणाले. पण हा बोगदा अजूनही फार लांब आणि अंधारलेला आहे, आणि याचा शेवट गाठण्याचा प्रवास अजूनही दीर्घ आणि अडचणींनी भरलेला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. त्यानंतर भारत, फ्रान्स आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो. आठवड्याला कोरोनामुळे होत असलेल्या कोरोनो रुग्णांच्या मृत्यूत १७ टक्केंनी घट झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
हेही वाचा