पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 साठी मिनी लिलाव मंगळवार. १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी छप्परफाड कमाई केली. तर दुसरीकडे भारतीय नवोदित क्रिकेटपटूंनीही अनपेक्षित कमाई केली आहे. यामध्ये शुभम दुबे, शाहरुख खानसह अनेक खेळाडू होते मात्र त्यांच्यामध्ये अग्रस्थानी नाव राहिले ते उत्तर प्रदेशच्या समीर रिझवी यांचे. IPL लिलावात समीरला विकत घेण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर समीर रिझवीवर ८.४० कोटींची बोली लावली चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. ( IPL Auction Sameer rizvi ) जाणून घेवूया आयपीएल लिलावात मूळ किंमत २० लाख रुपये असणार्या समीर रिझवीविषयी…
चेन्नईने समीरला विकत घेण्यासाठी पहिली बोली 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसने लावली. यानंतर त्यांचा सामना गुजरात संघाशी झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने 7.40 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली आणि नंतर बोलीतून हा संघ बाहेर पडला; पण यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बोलीत प्रवेश केला. दिल्लीनेही केवळ दोनदा बोली लावली. अशाप्रकारे गुजरात आणि दिल्लीशी झुंज दिल्यानंतर अखेर चेन्नई संघाने बाजी मारली. अखेर चेन्नई संघाने समीरला 8.40 कोटींची बोली लावून विकत घेतले.
२० वर्षीय समीरची ओळख उजव्या हाताचा सुरेश रैना, अशी ओळख आहे. टीम इंडियाचा माजी डाखखुरा फलंदाज सुरेश रैना सारखीच फलंदाजी करणारा समीर हा मूळचा मेरठचा रहिवासी आहे. देशांतर्गत क्रिकेट हंगाम आणि उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये त्याने केलेली फलंदाजी लक्षवेधी ठरली. समीरने UP T20 लीगच्या 9 डावात तब्बल 455 धावा फटकावल्या. या हंगात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता. त्याने 47 चेंडूत लीगचे सर्वात वेगवान शतकही केले. या स्पर्धेत एकूण 35 षटकारही ठोकले.
यूपी टी-20 लीगनंतर समीरने अंडर-23 ट्रॉफीमध्येही आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत त्याने 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 6 डावात 37 षटकार मारत एकूण 454 धावा केल्या. या कामगिरीच्या आधारे आयपीएल स्काऊटने माजी भारतीय क्रिकेटपटू अभिनव मुकुंदला सांगितले होते की, समीर हा उजवा हात सुरेश रैना आहे. त्यामुळेच सीएसकेने एवढी मोठी रक्कम खर्च करून समीरला विकत घेतले आहे.