ऐश्वर्या राय : मॉडलिंग, मिस वर्ल्ड, फ्लॉप चित्रपट आणि…

ऐश्वर्या राय : मॉडलिंग, मिस वर्ल्ड, फ्लॉप चित्रपट आणि…

एखाद्या सौंदर्यवतीसाठी आपल्‍या डोक्‍यावर सौंदर्यवतीचा मुकूट पाहणं म्‍हणजे अविस्‍मरणीयच क्षण असतो. काळ कोणताही असो, तरुणींचं सौंदर्य नेहमीच आकर्षित करणारं आणि प्रभाव पाडणारं असतं. त्‍याचं व्‍यक्‍तिमत्त्‍वही अनेकदा छाप पाडून जातं. सौंदर्याबरोबरच हुशार, तत्‍काळ निर्णय घेण्‍याची क्षमता आणि कलेमध्‍ये प्रावीण्‍य असणार्‍या तरुणींची नेहमीच स्‍तुती केली जाते. सार्वजनिकपणे तरुणींचं टॅलेंट दिसण्‍यासाठी काळानुरूप, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्‍हर्स यासारख्‍या स्‍पर्धादेखील अस्‍तित्त्‍वात आल्‍या. जागतिकीकरणाच्या युगात सौंदर्याच्या स्‍पर्धा या वैश्‍विक स्‍तरावर पोहोचल्‍या. मिस वर्ल्ड या स्‍पर्धेचेच घ्‍या. जगभरातील तमाम देशांतील सौंदर्यवती मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी होतात. परंतु, जिंकते तिचं जी सौंदर्याबरोबर आपलं टॅलेंट जगासमोर मांडते. असेचं टॅलेंट ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्ड १९९४ मध्ये दाखवले होते. ऐश्वर्या राय हिने जगभरातील सौंदर्यवतींना पिछाडीलवर टाकत ही स्पर्धा जिंकली होती.

सौंदर्याचे मोजमाप करायला न कुठले माप असते ना परिमाण. परंतु, माणसांनी सौंदर्याचे विश्‍लेषण करण्‍यासाठी स्‍पर्धा ठेवल्‍या. सौंदर्य आणि स्‍किल या दोन्‍ही कसोट्‍या पार करून अनेक तरुणींनी मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं आहे. सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं म्‍हणजे केवळ आपलं सौंदर्य दाखवणं, इतकचं असत नाही तर तरुणींमधले सुप्‍त गुण, त्‍यांची कला, स्‍किल या गोष्‍टीही पाहिल्‍या जातात.
मिस वर्ल्ड या सौंदर्य स्‍पर्धेत सहभागी होणार्‍या शंभरहून अधिक देशांतील सौंदर्यवतींबरोबर स्‍पर्धा करुन ही कठीण स्‍पर्धा पार पाडणे, तितके सोपे राहिलेले नाही.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन

विश्‍वसुंदरी निवडणारी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची स्‍थापना २९ जुलै १९५१ मध्ये झाली होती. पहिली स्‍पर्धा कॅलिफोर्नियाच्‍या पॅसिफिक मिल्‍सने १९५२ मध्‍ये घेतली होती. १९६६ च्‍या आधी केवळ परदेशातच सौंदर्य स्‍पर्धा आयोजित केल्‍या जात होत्या. पाश्‍चात्‍य देशातील तरुणी त्‍यात सहभागी व्‍हायच्‍या. आता जगभरातील कानाकोपर्‍यातून तरुणी सहभागी होतात. त्‍यात भारतानेही जगाच्‍या नकाशावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. रिटा फारिया, ऐश्‍वर्या, डायना हेडन, युक्‍ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्‍लर या भारताच्‍या सौंदर्यवतींनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मॉडलिंग आणि चित्रपटांची रेलचेल

ऐश्वर्या राय हिला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्‍वर्याने आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍ट्रॅक्‍ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्‍हती. विशेष म्‍हणजे याकाळात तिच्‍याकडे २४ चित्रपटांचे प्रस्‍ताव आले होते.

पुढे ऐश्‍वर्या राय चित्रपटात आली. मणीरत्‍नम यांचा 'इरुवर' या तामिळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्‍लॉप ठरले. परंतु, ऐश्‍वर्याने हार मानली नाही. १९९९ मध्‍ये अभिनेता अक्षय खन्‍नासोबत तिने 'आ अब लौट चले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहीट ठरला. त्‍यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले.

संजय लीला भन्‍साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केला. त्‍यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा 'ताल' आणि भन्‍साळी यांच्‍या 'देवदास'ने ऐश्‍वर्याच्‍या अभिनयात चारचाँद लावले.

ऐश्वर्या राय हिला २०१४ च्‍या 'मिस वर्ल्ड पीजेंट' दरम्‍यान 'सक्सेसफुल मिस वर्ल्ड'ने गौरवण्‍यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्‍ये मिस वर्ल्ड स्‍पर्धेत ऐश्‍वर्याला चीफ गेस्ट म्‍हणूनही आमंत्रित करण्‍यात आलं होतं.

ऐश्वर्या रायचा जन्‍म १ नोव्‍हेंबर १९७३ रोजी मंगळुर, कर्नाटकात झाला. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज मरीन इंजिनिअर होते. तिच्‍या आईचे नाव वृंदा राय. त्‍या लेखिका आहेत. ऐश्वर्याचा एक मोठा भाऊ देखील आहे. त्‍याचं नाव आदित्य राय असं आहे.

ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलु आहे. शिवाय, तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषा देखील येतात. ऐश्वर्या रायचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता ७वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्‍ये झालं. त्‍यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत आले.

मुंबईत ॲशने सांताक्रूज येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर डी. जी. रुपारेल कॉलेज, माटूंगा येथे शिक्षण घेतलं. शिक्षणासोबत तिने मॉडलिंगकडेही लक्ष दिलं.

ऐश्वर्याला मॉडलिंगचा पहिला प्रस्ताव कॅमलिन कंपनीकडून मिळाला होता. त्‍यावेळी ॲश नववीत शिकत होती. नंतर ती कोक आणि पेप्सीच्‍या जाहिरातीत दिसली.

  • या भारतीय सौंदर्यवतींनीही मिळवलं ग्लॅमर आणि करिअर

भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया

भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया. १९६६ मध्‍ये पहिल्‍यांदा भारताचं प्रतिनिधीत्‍व करत रिटा फारियाने विश्‍वसुंदर स्‍पर्धेत आपली उपस्‍थिती लावली होती. मिस वर्ल्डचं मुकूट परिधान करून भारतच नाही तर जागतिक स्‍तरावर भारताची नवी ओळख तिनं करून दिली. सावळ्‍या रंगाची १९ वर्षीय रिटा फारिया त्‍यावेळी मुंबईच्‍या जे. जे. कॉलेजमध्‍ये मेडिकलची विद्यार्थिनी होती. रिटा एक डॉक्टर (फिजीशियन) देखील आहे. तिचा जन्म मुंबईत १९४५ ला झाला.

मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेणं, तिच्‍यासाठी स्‍वप्‍नासारखं होतं. परंतु, तिची मोठी बहीण फिलोमिनाच्‍या आग्रहास्‍तव रिटा सौंदर्य स्‍पर्धेत उतरली. रिटाची मिस इंडिया स्‍पर्धेसाठी निवड झाली. त्‍यावेळी तिने आईची जुनी साडी आणि जुने सी सँडेल घालून रॅम्‍प वॉक केलं होतं. मिस इंडिया स्‍पर्धा तिने जिंकली. काही कालावधीनंतर ती लंडनच्‍या रॉयल अल्‍बर्ट हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. तिथेही तिने आपली चुणूक दाखवून मिस वर्ल्डचं मुकूट आपल्‍या नावे केलं.

डायना हेडन

ऐश्‍वर्यानंतर १९९७ मध्‍ये हैदराबादच्‍या डायना हेडनने मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं. सावळ्‍या रंगाची डायनाचं व्‍यक्‍तिमत्त्‍व आकर्षक होतं. डायना 'बिग बॉस-२'मध्‍ये तसेच अनेक चित्रपटांतही भूमिका केल्‍या आहेत. तिचं चित्रपट करिअर म्‍हणावं फुललं नाही.

युक्ता मुखी

लंडनमध्‍ये ४ डिसेंबर, १९९९ मध्ये युक्‍ताने ४९ वी मिस वर्ल्ड स्‍पर्धा जिंकली. ९३ देशांच्‍या सौंदर्यवतींना मागे टाकत या मुकूटावर आपलं नाव कोरलं. युक्‍ता मुखीला सहजासहजी हा किताब मिळाला नव्‍हता. तिच्‍या वडिलांना सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं पसंद नव्‍हते. युक्‍ताने डॉक्‍टर बनावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. परंतु, युक्‍ताने आपल्‍या वडिलांना जिंकून दाखवेन, असा विश्‍वास दिला. युक्ताने २००२ मध्‍ये आलेला चित्रपट 'प्यासा' मधून बॉलिवूड डेब्‍यू केलं होतं. त्‍यात आफताब शिवदासानीची मुख्‍य भूमिका होती. हा चित्रपट फ्‍लॉप ठरला. त्‍यानंतर २००५ मध्‍ये युक्‍ताने 'मेमसाब' आणि 'लव्‍ह इन जपान' चित्रपट केले. या चित्रपटांची जादू बॉक्‍स ऑफिसवर म्‍हणावी तशी चालली नाही.

प्रियांका चोप्रा

सन २००० मध्‍ये प्रियांकाने मिस वल्‍ड स्‍पर्धा जिंकली. प्रियांकाचा जन्‍म जमशेदपूरमध्‍ये झाला. नंतर ते बरेलीत आले. नंतर प्रियांका आई मधू चोप्रा यांच्‍यासोबत मुंबईत आली, आणि मिस इंडिया स्‍पर्धेत उतरली. टॅलेंट आणि सौंदर्याच्‍या जोरावर प्रियांकाने मिस इंडियाचा किताब पटकावला. त्‍यावेळी प्रियांका १८ वर्षांची होती. त्‍यानंतर मिस वर्ल्डच्‍या तयारीसाठी प्रियांकाने मुंबईच्‍या जयहिंद कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला होता. तिने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी झाली स्‍पर्धा जिंकलीही. लंडनच्‍या मिलेनियम डोममध्‍ये प्रियांकाला युक्‍ता मुखीने मुकूट घातला होता. मिस वर्ल्ड बनल्‍यानंतर 'द हीरो'तून प्रियांकाने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केलं. एकानंतर एक सुपरहिट चित्रपट देऊन ती बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री बनली.

भल्‍याभल्‍यांना मागे टाकले मानुषीने

मानुषी छिल्लरने १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड २०१७ चा मुकूट आपल्‍या नावे केला. आधी प्रियांकाने २००० मध्‍ये हा मुकूट परिधान केला. मानुषीने चीनच्‍या सान्या शहर एरीनामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. जगभरातील विविध देशांतील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकून मानुषीने ही स्‍पर्धा जिंकली. मानुषीने आपलं शिक्षण दिल्‍लीच्‍या सेंट थॉमस स्‍कूलमध्‍ये पूर्ण केलं. नंतर सोनीपतच्‍या गव्‍हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्‍ये तिने प्रवश घेतला. ती एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे.

मिस वर्ल्ड होण्‍यासाठी तिने शिक्षणातून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. त्‍याआधी २०१६ मध्‍ये तिने कॉलेज प्रिन्‍सेसचा किताब पटकावला होता. तिला तेथे ब्‍युटी विथ ब्रेन असं म्‍हटलं जायचं. २०१६ मध्‍ये ती मिस हरियाणा देखील झाली होती. जून २०१७ मध्‍ये मुंबईत झालेली फेमिना मिस इंडियाच्‍या स्‍पर्धेत मानुषीने ३० सौंदर्यवतींना मागे टाकले.

आज छोट्‍या-छोट्‍या शहरांतही सौंदर्यस्‍पर्धा भरवल्‍या जात आहेत. अनेक तरुणींना आपलं सौंदर्य, आपले गुण, टॅलेंट दाखवण्‍यासाठी हे एक हक्‍काचं व्‍यासपीठ मिळालय. याचं व्‍यासपीठावरून त्‍यांना जगात ओळख निर्माण करण्‍याची संधी मिळते. कुणीही ओळखत नसलेल्‍या त्‍या तरुणींना सौंदर्य स्‍पर्धांच्‍या माध्‍यामातून एका रात्रीत जग ओळखू लागतं.

सौंदर्यस्‍पर्धेतून जगभर ओळख निर्माण होते. आता या स्‍पर्धा केवळ सौंदर्यस्‍पर्धा राहिल्‍या नसून त्‍याकडे ग्‍लॅमर म्‍हणून पाहिले जाते. स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर अनेक चित्रपटांचे प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे येऊ लागतात. या स्‍पर्धांकडे एक करिअर म्‍हणूनही पाहिले जाते. अशा स्‍पर्धांमुळे करिअरच्‍या अनेक संधी निर्माण होताहेत. काळानुसार आता सौंदर्याच्या व्‍याख्या बदलल्या आहेत. जागतिक पातळीवर एकाद्या स्‍त्रीच्या सौंदर्याचा गौरव होतो तेव्‍हा तो तिचा एकटीचा गौरव होत नाही तर स्‍त्री जातीचाही तो गौरव होत असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news