महागाई नियंत्रणासाठी गहू, तांदूळ खुल्या बाजारात

महागाई नियंत्रणासाठी गहू, तांदूळ खुल्या बाजारात

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था : गहू, आटा आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार खुल्या बाजारात गहू, आटा आणि तांदळाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने 2.85 लाख टन गहू आणि 5,180 टन तांदूळ बाजारात आणला आहे. यामुळे सामान्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालय आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारातील तांदूळ, गहू आणि आट्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारात थेट हस्तक्षेप करीत 5,180 टन तांदूळ आणि 2.85 लाख टन गहू सरकारने बाजारात आणला आहे. सरकारने सरासरी दर्जाच्या गव्हासाठी 2,150 रुपये प्रतिक्विंटल आणि चांगल्या दर्जाच्या गव्हासाठी 2,327.04 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला होता. आटा तयार करण्यासाठी मिल चालकांकरिता सरकारने 27.50 रुपये किलो दराने 25 लाख टन गव्हाची विक्री केली आहे.

खुल्या बाजारातून खरेदी

खुल्या बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने लिलावाद्वारे यापूर्वीच देशांतर्गत बाजारातील गहू खरेदीची कमाल मर्यादा 100 मेट्रिक टनांवरून दुप्पट म्हणजे 200 मेट्रिक टनांपर्यंत वाढविली आहे. सोबतच ई-लिलाव प्रक्रियेमध्येदेखील गव्हाचे प्रमाण 2 मेट्रिक टनांवरून 3 लाख मेट्रिक टन केले आहे. यामुळे व्यापार्‍यांना खुल्या बाजारातून 200 मेट्रिक टनांपर्यंत गव्हाची खरेदी करण्याची मुभा असेल.

साप्ताहिक ई-लिलाव

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या बाजार हस्तक्षेपाच्या योजनेचा भाग म्हणून गहू आणि तांदूळ या दोन्हींचा साप्ताहिक ई-लिलाव होत असतो. 2023-24 मधील 18 वा ई-लिलाव नुकताच झाला. यात देशभरातील 444 भांडारांमधून 2.01 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली. यामध्ये गव्हासाठी 2,763 खरेदीदार ई-लिलावात सहभागी झाले होते आणि त्यातील 2,318 जणांनी 1.92 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news