पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवार, २५ ऑगस्ट राेजी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काेल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले होते. परंतु, पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांचे विश्वासू निकटवर्तीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात जाण्यास पसंती दिली. त्यांच्याबरोबर पक्षाचे चंदगडचे आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनीही मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार यांच्यासोबत व्ही.बी.पाटील, आर. के. पवार, माजी आमदार राजीव आवळे असे शिलेदार राहिले आहेत. त्यामुळे काेल्हापूरमधील जाहीर सभेत शरद पवार मंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar On Hasan Mushrif)
शरद पवार यांची दसरा चौकात शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजता निष्ठावान निर्धार सभा होणार आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. सुमन पाटील, आ. रोहित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. (Sharad Pawar On Hasan Mushrif)
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामागे 'ईडी'चा ससेमिरा लागला होता. त्यांची ईडीने दोनदा चौकशीही केली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सहकाऱ्यांवर शरद पवार यांनी टीका करण्याचे आतापर्यंत टाळले आहेे परंतु, छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना ईडीला घाबरून पक्षातील काही सहकारी भाजपसोबत सत्तेत गेल्याचे सूचक विधान पवार यांनी केले होते. त्यामुळे पवार मुश्रीफ यांच्यावर काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यानच्या काळात मुश्रीफ भाजपमध्ये जाणार का?, अशा चर्चा सुरू होत्या. मुश्रीफ यांनी मी पवार एके पवार मानणारा नेता आहे, असे स्पष्ट करत भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडन केले होते. परंतु, अजित पवारांच्या बंडानंतर हसन मुश्रीफ यांनी थेट त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. शरद पवारांचे निष्ठावान, अशी ओळख असलेले मुश्रीफ पवारांची साथ सोडणार नाहीत, अशी अनेकांची अटकळ होती. परंतु, बदलत्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्यास पसंती दिली आहे.
मुश्रीफ यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. इचलकरंजीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहू, अशी भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील हेवीवेट नेते अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. परंतु, शरद पवारांना मानणार मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. ज्येष्ठ नेते व्ही.बी. पाटील, आर.के. पाेवार यांच्यासह हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे पवार यांच्यासोबत आहेत. आता पवार यांना काेल्हापूर जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमाेर आहे.
हेही वाचा