विमान प्रवासात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर?, काय केले जाते?

विमान प्रवासात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर?, काय केले जाते?

लंडन : प्रवासात प्रसूती होऊन बाळाचा जन्म झाल्याच्या अनेक घटना देश-विदेशात घडलेल्या आहेत. बस, रेल्वे आणि अगदी विमानातही असे प्रकार घडले आहेत. जन्म आणि मृत्यू कधी होईल हे काही सांगता येत नाही. अर्थात प्रवासातील जन्माची अनेक उदाहरणे आपल्या वाचनात येत असतात; पण जर विमान प्रवास करीत असतानाच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? अशावेळी काय केले जाते याची अनेकांना माहिती असत नाही. आता एका फ्लाईट अटेंडंट म्हणजेच हवाई सुंदरीनेच याबाबतची माहिती सांगितली आहे.

'व्हर्जिन ऑस्ट्रेलिया' या विमान कंपनीतील फ्लाईट अटेंडंट ब्रेना यंग यांनी याबाबतचा त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी सांगितले की विमान प्रवासावेळी अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सर्वात आधी त्या व्यक्तीचे सीट सेक्युअर केले जाते. विमान जमिनीवर उतरताच तपास करणार्‍या अधिकार्‍यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे केले जाते. यामुळे प्रवाशाचा मृत्यू कशामुळे झाला, तो खून होता का याबाबत अधिक स्पष्टपणे तपास होण्यास मदत होते. अर्थात यामुळे अन्य प्रवाशांना आपल्या जागेवरून हलता येत नाही. जोपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा होत नाही तोपर्यंत प्रवाशांना विमानातच बसून राहावे लागते.

अशावेळी मृतदेहाला ब्लँकेटच्या मदतीने झाकून ठेवण्यात येते. तुर्की ते रशिया प्रवास करणार्‍या विमानात एक घटना अशीच घडली होती. एका 50 वर्षांच्या महिलेचा विमान प्रवास सुरू झाल्यानंतर 45 मिनिटांमध्येच मृत्यू झाला होता. या महिलेला मधुमेह होता आणि विमानात तिच्याकडे इन्शुलिन नसल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी हा सर्व प्रवास भयावहच होता! दरवर्षी अशा अनेक घटना घडतात असेही ब्रेना यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे असे काही घडल्यास विमानातील अन्य प्रवाशांना याबाबत सांगितले जात नाही. कित्येक वेळा तर शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही सांगितले जात नाही. संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाला विमानातील कर्मचारी 'एचआर' म्हणजेच 'ह्युमन रिमेन्स' असे संबोधतात. प्रवाशांना विमान उतरल्यानंतरच परिस्थितीची कल्पना दिली जाते. एखादी व्यक्ती प्रवासात मरण पावल्यास तिच्या मृतदेहाला सन्मानपूर्वक हाताळणे गरजेचे असते व तत्संबंधी सर्व काळजी घेतली जाते, असेही ब्रेना यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news