पीएफ खाते ते क्रेडिट कार्ड… आज १ एप्रिलपासून होणार ‘हे’ बदल

पीएफ खाते ते क्रेडिट कार्ड… आज १ एप्रिलपासून होणार ‘हे’ बदल
Published on
Updated on

आज एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. याबरोबरच आर्थिक बाबींशी निगडित काही महत्त्वाचे बदलही अमलात येत असून यात एनपीएस लॉगइन, क्रेडिट कार्ड तसेच फास्टॅगशी संबंधित महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे.

पीएफ खाते आपोआप नवीन कंपनीकडे होणार ट्रान्स्फर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) खातेधारकांसाठी दिलासादायक बदल आजपासून लागू होत आहे. यापूर्वी नोकरी बदलल्यानंतर आपले पीएफ खाते नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करण्यासाठी तसा अर्ज करावा लागत होता. आता ही प्रक्रिया आपोआप होईल.

एनपीएस लॉगइनसाठी आधार संलग्न मोबाईल क्रमांक अनिवार्य

निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) खातेधारकांना सायबर घोटाळ्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लॉगइन यंत्रणेत बदल केला आहे. त्यानुसार आता खात्यात लॉगइन करण्यासाठी खातेधारकांना युजर आयडी आणि पासवर्डसह आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य ठरणार आहे.

एसबीआय डेबिट कार्डच्या देखभाल शुल्कात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व प्रकारच्या डेबिट कार्डवरील वार्षिक देखभाल शुल्कात ७५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आजपासून होईल. याखेरीज बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर मिळणारे रिवॉर्ड पॉईंटही आजपासून बंद होणार आहेत. एसबीआय कार्ड पल्स, एसबीआय कार्ड एलिट अॅडव्हॉटेज, एयूआरयूएम, सिम्प्लीक्लिक क्रेडिट कार्डबाबत या सवलती बंद होत आहेत.

आयसीआयसीआय, येस बँकेकडून हा बदल

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डधारकाने आता एका तिमाहीत ३५ हजार रुपयांवर खर्च केल्यास त्याला कॉम्प्लिमेन्ट्री एअरपोर्ट लाऊंजचे अॅक्सेस मिळेल. येस बँकेनेही एका तिमाहीत किमान १० हजार रुपये खर्च करणाऱ्या क्रेडिट कार्डधारकासाठी विनामूल्य देशांतर्गत एअरपोर्ट लाऊंजचा अॅक्सेस उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ओलाच्या वॉलेट नियमांत बदल

ओला मनीनेही आपल्या वॉलेट नियमांत बदल केले आहेत. लहान 'पीपीआय' (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट) वॉलेट सेवेसाठीची मर्यादा १० हजारांपर्यंत वाढवली जाणार आहे.

फास्टॅग केवायसी अपडेट केलीत का?

एनएचएआयने वाहनधारकांना एक एप्रिलपूर्वी फास्टंग केवायसी अपडेट करण्याच्या सूचना केल्या होत्या. ज्यांनी ही प्रक्रिया केली नसेल, अशांची खाती निष्क्रिय होणार असून, यामुळे खात्यावर पैसे असूनही फास्टेंगद्वारे टोलचे पैसे अदा करणे शक्य होणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news