‘सूर्या’च्या खेळीने विजयी ‘तिलक’; टीम इंडियाचे जोरदार बाऊन्सबॅक

‘सूर्या’च्या खेळीने विजयी ‘तिलक’; टीम इंडियाचे जोरदार बाऊन्सबॅक

गयाना; वृत्तसंस्था : पहिल्या दोन टी-20 सामन्यांत सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाची गाडी रुळावर आली. सूर्यकुमार यादव (83) आणि एन. तिलक वर्मा (नाबाद 49) यांच्या धुवाँधार बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाने मालिकेत जोरदार बाऊन्सबॅक केले. वेस्ट इंडिजच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 7 विकेटस् आणि 13 चेंडू शिल्लक ठेवून शानदार विजय मिळवला. पॉवेलच्या चेंडूवर हार्दिक पंड्याने विजयी षटकार ठोकला; पण युवा खेळाडू तिलक वर्मा एका धावेने सलग दुसर्‍या अर्धशतकापासून वंचित राहिला. भारताने मालिकेतील आव्हान 2-1 असे जिवंत ठेवले आहे.

यशस्वी जैस्वाल (1) व शुभमन गिल (4) हे सलामीवीर अपयशी ठरले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून इरादे स्पष्ट केले. तिलक संयमी खेळ करताना दिसला. सूर्यकुमारने 23 चेंडूंत 14 वे अर्धशतक पूर्ण केले. वरुणराजा गर्जत असताना सूर्या मैदानावर चांगली फटकेबाजी करत होता. सूर्यकुमार शतक झळकावेल, असे वाटत असताना अल्झारी जोसेफने ही विकेट मिळवली. सूर्या 44 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 83 धावांवर माघारी परतला.

सूर्याने 2 बाद 34 वरून डाव सावरला अन् तिलकसह 51 चेंडूंत 87 धावांची भागीदारी केली. सूर्याचे शतक थोडक्यात हुकले. भारताकडून सर्वाधिक टी-20 धावा करणार्‍या फलंदाजांत सूर्याने शिखर धवनला मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे. सूर्याने सेट केलेली मॅच तिलक व हार्दिक पंड्याने पुढे नेली. तिलक 39 चेंडूंत 49 धावांवर नाबाद राहिला आणि हार्दिकने नाबाद 20 धावा करून विजयी षटकार खेचला. भारताने17.5 षटकांत 3 बाद 164 धावा करून सामना जिंकला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिकने पहिल्या चार षटकांत 4 गोलंदाजांचा वापर करून वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. कायेल मेयर्स व ब्रेंडन किंग यांनी चांगली सुरुवात करून देताना 7 षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. मागील सामन्यात एकही षटक न मिळालेल्या अक्षर पटेलने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने आठव्या षटकात ही जोडी तोडली अन् मेयर्स 25 धावांवर अर्शदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. अक्षरने 4 षटकांत 24 धावांत 1 विकेट घेतली.

11 व्या षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर जॉन्सन चार्ल्स (12) पायचित झाला. मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले होते आणि डीआरएस घ्यायचा की नाही, याबाबत भारतीय खेळाडूही संभ्रमात होते; पण 1 सेकंद शिल्लक असताना हार्दिकने डीआरएस घेतला अन् तो यशस्वी ठरला. फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनने येताच षटकार-चौकार खेचले; पण कुलदीपच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात पूरन (20) यष्टिचित झाला. त्याच षटकात कुलदीपने आणखी एक सेट फलंदाज किंगला (42) बाद केले. ही त्याची टी-20 तील पन्नासावी विकेट ठरली.

कुलदीपने 28 धावांत 3 विकेटस् घेतल्या. युझवेंद्र चहलला 33 धावा देऊन एकही विकेट घेता आली नाही. 18 व्या षटकात मुकेश कुमारला पहिले षटक दिले गेले अन् त्याने पहिल्याच चेंडूवर शिमरोन हेटमायरला (9) झेलबाद करून माघारी पाठवले. रोव्हमन पॉवेलने अखेरच्या षटकात फटकेबाजी करून संघाला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. अर्शदीपने टाकलेल्या 19 व्या षटकात पॉवेलने 17 धावा चोपल्या. मुकेशने 20 व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवेलने 19 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा करून संघाला 5 बाद 159 धावांपर्यंत पोहोचवले.

कुलदीपची कमाल

दुसर्‍या टी-20 मध्ये दुखापतीमुळे मुकलेल्या कुलदीप यादवने तिसर्‍या सामन्यात कमाल केली. त्याने वेस्ट इंडिजच्या 3 फलंदाजांना बाद करून आंतरराष्ट्रीय टी-20 त सर्वात जलद 50+ विकेटस् घेणार्‍या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. कुलदीपने 29 इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना वनिंदू हसरंगाला (30) मागे टाकले. भारताकडून टी-20 मध्ये 50+ विकेटस् घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला.

यशस्वीचे पदार्पण अयशस्वी

कसोटी मालिकेत दमदार पदार्पण करणार्‍या यशस्वी जैस्वालला टी-20 मध्ये पदार्पणाची संधी दिली गेली. भारताकडून टी-20 त सलामीला येणारा यशस्वी (21 वर्ष व 223 दिवस) हा युवा फलंदाज ठरला; पण कसोटीसारखे त्याचे पदार्पण गाजले नाही. तो पहिल्याच सामन्यात फक्त एका धावेवर बाद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news