Weather Update : राज्यात पुणे जिल्हा गारठला; पारा 8.2 अंशांवर
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुणे जिल्ह्याचे तापमान शुक्रवारी सर्वांत नीचांकी नोंदवले गेले. शिरूरचे किमान तापमान 8.2, तर एनडीए परिसराचा पारा 9.3 अंशांवर खाली आला होता. दरम्यान, मराठवाडा व विदर्भात 25 व 26 रोजी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. काश्मिरात हिमवर्षाव जोरदार सुरू आहे. या दोन्ही कारणांमुळे महाराष्ट्रातही थंडीची लाट सक्रिय होत आहे. दिवसा कडक उन्ह, तर पहाटे व रात्रीची थंडी असे वातावरण 28 फेब्रुवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळच्या वेळी सर्वांत कमी तापमान पुणे जिल्ह्यात होते. शिरूरचा पारा 8.2, तर एनडीए परिसराचा पारा 9.3 अंशांवर खाली आला होता.
किमान तापमानात 2 ते 3 अंशांचा फरक
हवामान विभाग दिवसभरात दोन वेळा तापमानाचा अंदाज देते. उत्तर रात्र ते पहाटेचा अंदाज सकाळी 8 वाजता प्रसारित होतो. दुसरा अंदाज सायंकाळी 7 वाजता दिला जातो. या दोन्ही वेळेच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांचा फरक आहे. पुणे शहराचे किमान तापमान शुक्रवारी 9.3 होते. सायंकाळी 7 वाजता ते 10.9 झाले.
पुणे जिल्हा तापमान (सकाळी 8 वा.)
शिरूर 8.2, एनडीए 9.3, माळीन 10.4, लवासा 10.7, आंबेगाव 10.9, राजगुरुनगर 10.9, लोणावळा 11.2, तळेगाव 11.5, नारायणगाव 11.7, शिवाजीनगर 11.7
राज्याचे किमान तापमान (सायंकाळी 7 पर्यंत)
पुणे (एनडीए 10.9, शिवाजीनगर 12.5), अहमदनगर 13.6, जळगाव 14.4, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 14.2, नाशिक 16.2, सांगली 16.9, सातारा 13.5, सोलापूर 18.2, छत्रपती संभाजीनगर 17.4, नागपूर 17.6, अकोला 18.4, अमरावती 17.5
हेही वाचा