Weather forecast: पुढील ४ दिवसांत उत्तर भारतातील थंडी ओसरणार

Weather forecast
Weather forecast

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट पसरली आहे. या थंडीच्या लाटेमुळे उत्तर भारतासह अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे धुके आणि हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडी कमी झाल्याने, पुढील चार दिवसांत उत्तर भारतात थंडीची लाट ओसरणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये दाट धुक्यांसह कमी प्रमाणात थंडी राहील, त्यानंतर ही थंडी हळूहळू कमी होईल असे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र येत्या २४ तासांत बिहार, मध्य महाराष्ट्र आणि अंतर्गत कर्नाटकात कमी प्रमाणात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.

या भागात १४ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता

गेल्या २४ तासांत उत्तर भारतातील अनेक भागांत किमान तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. याच कालावधीत, उत्तरेकडील मैदानी भागात आणि उत्तर मध्य प्रदेशच्या लगतच्या भागांमध्ये किमान तापमान पाच ते आठ अंश सेल्सिअसच्या श्रेणीत होते.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे १४ जानेवारीपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ११ ते १३ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या विखुरलेल्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news