Weather forecast | राज्यात पुढील ३ दिवस तापमानाचा पार वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Weather forecast | राज्यात पुढील ३ दिवस तापमानाचा पार वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Weather forecast : देशातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील ३ दिवसांत वायव्य भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा ३-६ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तेलंगणाचा बहुतांश भाग आणि महाराष्ट्रातील अंतर्गत (Interior Maharashtra) भागांमध्ये कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. गुजरात, छत्तीसगड, रायलसीमाच्या अनेक भागांत, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तामिळनाडूचा अंतर्गत भाग आणि केरळच्या काही भागांत कमाल तापमान २८-३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather forecast)

दरम्यान, दिवसा कमाल तापमान वाढल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी चक्रावाताचा परिणाम हिमालयीन प्रदेशावर २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि लगतचा उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, हिमाचल प्रदेश आणि जम्मू विभागाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ६ अंश सेल्सिअसने वाढेल. तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा काही भाग वगळता देशाच्या उर्वरित भागांत तापमान १ ते ३ अंस सेल्यिअसने जास्त राहणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

गहू पिकाला फटका

गहू उत्पादक राज्यांत तापमानात सामान्यपेक्षा ३-५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. याचा फटका गहू पिकाला (wheat crop) बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकतीच शेतकर्‍यांना एक ॲडव्हायजरी जारी करत त्यांना अचानक वाढलेल्या तापमानाच्या परिणामाबद्दल सावध केले आहे. "दिवसा वाढलेल्या तापमानाचा गव्हावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण गहू पीक पुनरुत्पादक वाढीचा कालावधी जवळ येत आहे, जो तापमानास संवेदनशील मानला जातो," असे IMD ने एका निवेदनात म्हटले आहे.

फेब्रुवारीमध्ये तापमानात असामान्य वाढ झाली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather forecast)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news