पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये पुन्हा एकादा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करावा, असे आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ. के. पॉल यांनी आज ( दि. २१) केला. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी डॉ. पॉल म्हणाले की, "तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल किंवा घरामध्ये थांबत असला तरी मास्कचा वापर करा,? ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी याचे पालन करावे. काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र सध्या विमान वाहतूक प्रोटोकॉलच्या संदर्भात कोणतेही बदल नाहीत. आरोग्य मंत्रालयात दर आठवड्याला आढावा बैठक घेण्यात येईल."
जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उच्च स्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत नीती आयोगाचे सदस्य डॉ.वीके पॉल यांच्यासह कोरोना वर्किंग ग्रुप प्रमुख डॉ.एन.के.अरोड,आयसीएमआरचे महासंचालक डॉ.राजीव बहल, जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले तसेच डीजीएचएस आरोग्य तसेच कुटूंब कल्याण मंत्रालयाचे डॉ.अतुल गोयल उपस्थित होते.
कोरोना संसर्ग अद्यापही पुर्णत: गेला नसल्याने सर्वांनी सतर्क आणि सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मांडविया म्हणाले. काही देशात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता तज्ञ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देशातील स्थितीचा आढावा घेतला. देश कुठल्या स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे ट्विट बैठकीनंतर मांडविया यांनी केले.तर, डॉ.पॉल यांनी कोरोना लसीकरणातील तिन्ही डोस आवश्यक असून सर्वांनी लसी घ्यावी,असे आवाहन केले.
देशातील केवळ २७ ते २८ टक्के नागरिकांनीच खबरदारी म्हणून बूस्टर डोस घेतला आहे. पात्र वयोगटातील विशेषत: वृद्धांनी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.पॉल यांनी केले. हा डोस बंधनकारक असून सर्वांना यासंबंधीचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. वर्दळीच्या ठिकाणी अथवा घरात मास्कचा वापर करण्याचे आवाहन पॉल यांनी केले.सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रामुख्याने मास्कचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग ग्रस्तांची जीनोम सीक्वेंसिंग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या आदेशानंतर लोकनायक तसच आयएलबीएस रुग्णालयात जीनोम सिक्वेंसिंग करीता संसर्गग्रस्तांचे नमुने एकत्रित केले जात आहेत.देशात कोरोनाचा नवीन व्हेरिंयट आला आहे का? याचा शोध घेण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. जापान, दक्षित कोरिया, ब्राझील, चीन तसेच अमेरिकेत कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची बाब ठरत आहे. यापूर्वीच जीनोम सिक्वेंसिंग साठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा सातत्याने तपासणी केली जात आहे. कोरोनाप्रभावित देशातून येणार्या प्रवाशांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.तपासणीदरम्यान कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना विलगिकरणात पाठवण्यात येईल.