बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सध्या वातावरण तणावपूर्वक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सीमा समन्वयकमंत्री आपला दौरा रद्द करतील, अशी अपेक्षा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रसंगी जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करू, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. कन्नड संघटनेने आज (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्रातील मंत्र्यांना जिल्हा बंदी करा, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांतील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे, की दोन राज्यांमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटक दौऱ्यावर येऊ नये, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली होती.
दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगावला जाणार आहेत. परंतु, याबाबत माहिती देताना शंभूराज देसाई यांनी आज (दि. ५) पत्रकार परिषदेत सांगितले की, सीमाभागातील जनतेला सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी आमचे सरकार कोठेही कमी पडणार नाही. अजुन आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील हालचाली वेगवान झाल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर गेले काही दिवस सीमाभागातील वातावरण तापले आहे.
हेही वाचलंत का ?