बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरमध्ये दहा कोटी रुपये खर्चून भव्य कन्नड भवन बांधण्यात येईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी करून पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. बोम्मई यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गमध्ये विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सोलापूर आणि केरळ राज्यातील कासरगोडमध्ये कन्नड भवन बांधण्याची घोषणा केली. ते म्हणाले, कन्नडिगांचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. कन्नड भाषिक लोक देशात, जगात कोठेही असले तरी त्यांच्या विकासाची आणि रक्षणाची जबाबदारी आमची आहे. ती आम्ही पार पाडू. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ दहा कोटी रुपये खर्चून कन्नड भवन बांधण्यात येईल. यामुळे भक्तांच्या निवासाची सोय होणार आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये 1800 ग्रामपंचायती विकसित करण्याची योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्त्यांच्या सुधारणेसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. जे सीमेपलीकडे आहेत, तेही आमचेच आहेत. कारण तेथील कन्नड शाळांकडे त्या त्या राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधा दिल्या नाहीत. तेथेही आम्ही मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, नगरविकास मंत्री बी. व्ही. बसवराज भैरती, खा. मंगल अंगडी आदी उपस्थित होते.
याआधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाने नव्याने उचल खाण्यापूर्वी मुख्यमंत्री बोम्मई यांनी पंढरपूृर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येेथेही कर्नाटकातून येणार्या भक्तांच्या सोयीसाठी कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली होती. शिवाय गोव्यातही कन्नड भवन बांधण्यासाठी जमीन देण्याची मागणी गोवा सरकारकडे केली होती. मात्र आता बेळगाव सीमाप्रश्नावर पुन्हा संघर्ष सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर-अक्कलकोटमध्ये कर्नाटक भवन बांधण्याचा पुन्हा उल्लेख केल्याने या घोषणेकडे महाराष्ट्राला डिवचवण्याच्या द़ृष्टीने बघितले जात आहे.
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे तणाव निर्माण झाला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करून त्यासाठी दहा कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर कर्नाटक अक्कलकोट, कोल्हापुरात कर्नाटक भवन उभारत असेल तर बेळगाव आणि बंगळुरातही महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, हा देश अनेक राज्ये एकत्र येऊन बनला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याबरोबर चांगले संबंध आहेत. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राने बेळगाव, बंगळुरात महाराष्ट्र भवन उभारावे. त्यासाठी त्यांनी जागा द्यावी.