‘आम्हाला निकालाची उत्सुकता नाही, निकाल आमच्या विरोधात ?’ : आ. वैभव नाईक

आ. वैभव नाईक
आ. वैभव नाईक

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : मला सुध्दा या निकालाची उत्सुकता होती, कारण ही लढाई सत्याची होती. परंतु, आताच मंत्रालयात शिंदे गटाचे एक व अजित पवार गटाचे एक असे दोन आमदार भेटले त्यांनी सांगितलं की, तुम्ही अपात्र होणार. ज्याप्रमाणे यापुर्वी सुध्दा सत्तेत असलेल्या आमदारांनी आम्हाला सांगितलं होत की, तुमच पक्ष व चिन्ह सुध्दा जाणार त्याप्रमाणे ते चिन्ह गेलं, पक्षही गेला तसेच आता ते आमदार आम्हाला अपात्र होणार म्हणून सांगत आहेत. त्यामुळे त्यांना आधीच निकाल माहित झालेला आहे. हा निकाल त्यांनी ठरवून घेतलेला असावा. आम्ही या निकालाच्या विरोधात कोर्टात तर जावू पण जनतेच्या न्यायालयात सुध्दा जाऊन न्याय मागू असे ठाकरे गटाचे आ. वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काही वेळातच लागणार असताना कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. नाईक हे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभु यांचा व्हिप आम्ही आतापर्यंत मानला आहे. अनेक अधिवेशनामध्ये सुनिल प्रभु यांचे व्हिप मान्य केले गेले. दि. २० जुननंतर सुध्दा आम्ही प्रभुंचेच व्हिप मान्य केले. सुप्रिम कोर्टाने सुध्दा सुनिल प्रभुंचा व्हिप योग्य ठरविला आहे. तरी सुध्दा आमच्या विरोधात निकाल गेला तर हा लोकशाहीला धक्का देणारा निकाल ठरणार आहे. असे ते म्हणाले.

तसेच आम्ही ठरवल आहे की, आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल आम्ही लोकांसोबत राहणार, उध्दव ठाकरेंसोबत राहणार आहोत. निकाल विरोधात गेला तर न्यायालयात जाण्याचा निर्णय आमचे वरिष्ठ ठरवतील. अध्यक्ष आणि मुख्यमंत्री दोन दिवसापुर्वीच भेटले. त्या बैठकीत निकाल ठरला कि काय? याची सांशकता वाटते. आमच्या गटाचे प्रतोद सुनिल प्रभु यांना सहा – सहा दिवस प्रश्न विचारून सुनावणी चालू होती. एकूणच या सर्व परिस्थितीवरून हा निकाल दोन दिवसापुर्वीच ठरला असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news