Sangli News : सावळज ग्रामपंचायत बरखास्त करा; खासदार गटाच्या सदस्यांची मागणी | पुढारी

Sangli News : सावळज ग्रामपंचायत बरखास्त करा; खासदार गटाच्या सदस्यांची मागणी

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : सावळज (ता. तासगाव) ग्रामपंचायत बरखास्त करा. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी खासदार गटाच्या दोन सदस्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन खासदार गटाचे सदस्य ऋषिकेश बिरणे आणि योगेश पाटील यांनी दिले आहे. Sangli News

या निवेदनात म्हटले आहे की, रिक्त असलेल्या आशा स्वयंसेविका भरती संदर्भात सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने ग्रामसभेचे खोटे इतिवृत्त लिहिले आहे. अपात्र उमेदवारास पात्र ठरवून आशा स्वयंसेविकांची अवैधरित्या भरती केली आहे. यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. Sangli News

या भरतीसाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा न घेता नियुक्तीसाठी पात्रतेचे निकष डावलून पदांची भरती केलेली आहे. ग्रामसभेच्या इतिवृत्तावर ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन ग्रामसभा झालेली दाखवलेली आहे. यासंदर्भात संतापलेल्या ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.

परंतु त्यांनीही या संदर्भात कोणतीही चौकशी अथवा कारवाई केलेली नाही. तसेच ग्रामपंचायतीची अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. मासिक मीटिंगमध्ये याचा जाब विचारला असता विरोधी गटाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा मोठा निधी अखर्चित आहे. अनेक कामात अनियमितता आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या अनेक अवैध कामाचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button