कोल्हापूर : पाणीपुरवठा अखेर सुरळीत

कोल्हापूर : पाणीपुरवठा अखेर सुरळीत
Published on
Updated on

कोल्हापूर, दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : लिंगा उपसा केंद्रातील दगडी पाट आणि चेंबर दुरुस्तीचे काम बुधवारी रात्री संपले. गुरुवारी दुपारनंतर उपसा केंद्रातील सर्व तिन्ही पंपांद्वारे उपसा सुरू करण्यात आला. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा सुरळीत, तर काही भागांत कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शहरात 36 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दररोज केला जाणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

कोल्हापुरातील गावठाण भागात पाणी पुरवठा करणार्‍या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर ढासळल्याने दगडी पाट चोकअप झाला होता. 2 नोव्हेंबरपासून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. बुधवारपर्यंत येथे एकच पंप सुरू होता. बुधवारी रात्रीपासून हळूहळू पाण्याचा फ्लो वाढविण्यात आला होता. गुरुवारी दुपारी 4 वाजता सर्व पंप पूर्ण क्षमतेने व उच्च दाबाने सुरू झाले. उपसा केंद्रातील 300 हॉर्सपॉवरचे दोन, 200 हॉर्सपॉवरचे एक 1 असे तीन पंप सुरू करण्यात आले. सी व डी वॉर्डसह इतर भागातील पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु, गेले आठवडाभर पाईपलाईन रिकाम्या असल्याने त्या न भरल्याने काही भागांत कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा झाला. परिणामी, पाण्यासाठी पुन्हा नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान, उपसा केंद्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जोखमीचे काम करणार्‍या मजुरांचा अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी सन्मान केला. त्यानंतर कर्मचारी दिवाळीसाठी घरी परतले.

माजी नगरसेवकांची दादागिरी…

दरम्यान, पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही भागात अपुरा व कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याप्रकरणी एका माजी नगरसेवकाने चावीवाल्याला काळे फासण्याचा इशारा दिला. दोन माजी नगरसेवकांनी महापालिका चौकात अपुरा पाणी पुरवठाप्रश्नी महिला शाखा अभियंत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अरेरावी केली. त्यामुळे महापालिका चौकात तणावाचे वातावरण झाले होते. संबंधित महिला अभियंता यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन पाणी पुरवठा विभागातून इतरत्र बदलीची मागणी केली.

अतिरिक्त आयुक्तांच्या केबीनला कुलूप लावण्याचा इशारा…

महापालिकेने तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या केबीनला कुलूप लावून आंदोलन करू. तसेच महापालिकेवर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा मुस्लीम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी दिला.

शहरात 36 ठिकाणी टँकरने पुरवठा…

शहरातील उंचावरील भागात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा झाला. रविवार पेठ, बिंदू चौक परिसर, आझाद चौक, गंगावेश, पंचगंगा तालीम परिसराचा समावेश आहे. त्यामुळे महिलावर्गांतून तीव— संताप व्यक्त करण्यात येत होता. परिणामी गुरूवारीही शहरात एकुण 36 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news