जलसंपदाचा अजब कारभार’: कार्यकारी अभियंता’ पदावर पदोन्नती फक्त अकरा महिन्यांसाठी

जलसंपदाचा अजब कारभार’: कार्यकारी अभियंता’ पदावर पदोन्नती फक्त अकरा महिन्यांसाठी
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचा अजब- गजब कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पदोन्नतीसाठी पात्र असलेले जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना डावलून कार्यकारी अभियंता या पदावर सहायक अभियंता (श्रेणी-1) या पदावरील अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे ही पदोन्नती देताना कार्यकारी अभियंता या पदावर केवळ ' अकरा महिन्यांचा तात्पुरता पदभार देण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचा सावळा गोंधळ उघड झाला असून, देण्यात आलेल्या पदोन्नत्या कोणत्या आधारावर दिल्या असा सवाल आता उपविभागीय सवंर्गातील अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान तात्पुरत्या अकरा महिन्याच्या कराराने या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली असल्याचे आदेश कार्यासन अधिकारी ग.स. परब यांनी शुक्रवारी निर्गमित केले.

जलसंपदाच्या राज्यातील विविध विभागातील सुमारे 50 हून अधिक उपविभागीय अभियंता सवंर्गातील् अधिकाऱ्यांना येत्या वर्षभरात ' कार्यकारी अभियंता ' या पदावर नियामुसार पदोन्नती मिळणार आहे. मात्र वेळेत पदोन्नती न मिळाल्याने नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील उच्च न्यायालयात शासनाच्या विरोधात उपविभागीय अभियंता सर्वगातील अधिकाऱ्यांनी याचिका केल्या होत्या. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर उपविभागीय अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता या पदावर वर्षभरात पदोन्नती देण्यासाठी कार्यवाही सुरू होणार होती. मात्र, अचानक राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेले सहायक अभियंता (वर्ग -1) या पदावरील 29 अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती देण्यात आली असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

या आदेशात स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे की, कार्यकारी अभियंता या पदावर देण्यात आलेल्या पदोन्नत्या या केवळ अकरा महिनेच असतील. शासनाने आतापर्यत केलेल्या पदोन्नतीमध्ये अशा प्रकारचा पहिल्यांदाच निर्णय घेतला असल्याबाबत अधिकाऱ्यांन देखील आर्श्चय व्यक्त केले आहे. दरम्यानच्या काळात जर उपविभागीय अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यास सध्या कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती दिलेल्या सहायक अभियंत्यांस (वर्ग-1) पदावनत करण्यात येईल. सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात असून या पदावर संबधित अधिकाऱ्याचा कायमस्वरूपी अधिकार राहणार नाही.

राज्यातील सहायक अभियंता(श्रेणी-1) आणि उपविभागीय अभियंता हे दोन्ही पदे वेतनश्रेणीनुसार एक सारखी असली तरी नियमानुसार उपविभागीय अभियंता या संवर्गातील अधिकाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची पदोन्नती होणे हे गरजेचे होते. मात्र त्यांना डावलून सहायक अभियंता (श्रेणी-1) या अभियंत्याची पदोन्नती केल्यामुळे गोंधळ सुरू झाला आहे. त्यातही दिलेली पदोन्नती ही केवळ अकरा महिन्याची असल्याने संभ्रम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news