Panchganga River : कोल्‍हापुरात महापुराचा धोका तूर्त टळला

Panchganga River : कोल्‍हापुरात महापुराचा धोका तूर्त टळला
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट सुरू झाली आहे. दिवसभरात सुमारे पावणेदोन फूट पाणी उतरले. रविवारी दुपारी दोननंतर पंचगंगा इशारा पातळीखाली आली. यामुळे कोल्हापूरला असलेला महापुराचा धोका तूर्त टळला आहे. दिवसभरात आणखी 18 बंधार्‍यांवरील पाणी उतरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. बालिंगा पूल सर्व वाहनांसाठी रविवारी खुला करण्यात आला.

रविवारीही दिवसभर पावसाने उघडीप दिली. दिवसभर सूर्यदर्शनही होत राहिले. अधूनमधून कोसळणारी एखादी दुसरी सर वगळता पावसाची विश्रांतीच होती. पाऊस कमी झाल्याने पंचगंगेची पातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. रविवारी सकाळी सात वाजता पाणी पातळी 40.2 फुटांवर होती. दुपारी दोन वाजता ती 39 फुटापर्यंत खाली आली. रात्री आठ वाजता 38.5 फुटांपर्यंत खाली आली.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आणखी 18 बंधारे खुले झाले. त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दहा नद्यांवरील अद्याप 31 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुलाच असून धरणातून सध्या 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातूनही 6 हजार 995 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अन्य धरणातील विसर्ग कमी झाला आहे. यामुळे पावसाचा जोर कमीच राहीला तर येत्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्ण ओसरेल, अशी शक्यता आहे.

शनिवारी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबपर्यंत आलेले पंचगंगेचे पाणी आता कमी होत आहे. रविवारी सायंकाळी पाणी गायकवाड वाड्याजवळ आले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण खुला होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-पन्हाळा, आंबेवाडी-वरणगे पाडळी या मार्गावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

जिल्ह्यात रविवारीही पावसाचा जोर जवळपास ओसरला आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. रविवारी सकाळी सातपासून दुपारी चारपर्यंत राधानगरी धरण परिसरात केवळ 20 मि.मी. पाऊस झाला. तुळशीत अवघा 8 मि.मी., वारणेत 4 , दूधगंगेत 9, कुंभीत 16 तर कासारीत 37 मि.मी. पाऊस झाला. पाटगावमध्ये 42 तर घटप्रभेत 43 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात रविवारी सकाळी अकरापर्यंत गेल्या 24 तासांत केवळ 7.7 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 33.5 मि.मी. तर भुदरगडमध्ये 20.8 मि.मी., राधानगरीत 14.2, शाहूवाडीत 13, पन्हाळ्यात 10 तर चंदगड तालुक्यात 9 मि.मी. पावसाची नोंद झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news