Kolhapur News | कोल्हापूरकरांचे स्वप्न अखेर साकारले! काळम्मावाडी धरणातील पाणी आले

Kolhapur News | कोल्हापूरकरांचे स्वप्न अखेर साकारले! काळम्मावाडी धरणातील पाणी आले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणी आणण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न अखेर साकारले. काळम्मावाडी धरणातील पाणी कोल्हापुरातील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी रात्री उशिरा पडले. गेली नऊ वर्षे सुरू असलेली थेट पाईपलाईन योजना अखेर पूर्णत्वास आली. तब्बल 50 वर्षांपासून मागणी असलेल्या काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याची कोल्हापूरकरांची जिव्हाळ्याची मागणी पूर्ण झाली. (Kolhapur News)

कोल्हापूरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. ठेकेदार कंपनीला 28 ऑगस्ट 2014 रोजी वर्कऑर्डर देण्यात आली. काळम्मावाडी धरणातून 53 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे कोल्हापुरात पाणी आणण्याची ही योजना आहे. वर्कऑर्डर सव्वादोन वर्षात काम पूर्ण होणे आवश्यक होते. परंतू त्या कालावधीत काहीच काम झाले नाही. योजनेसाठी आवश्यक असलेल्या अनेक शासकीय विभागांच्या परवानग्या घेतलेल्या नव्हत्या. योजनेत अनेक अडथळे निर्माण झाले. ठेकेदार कंपनीच्या अकार्यक्षमपणामुळेही योजना रेंगाळत गेली. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचाही फटका योजनेला बसला.

त्यामुळे योजना कधी पूर्ण होणार आणि कोल्हापुरकरांना काळम्मावाडी धरणातील पाणी मिळणार कधी? याची उत्सुकता शहरवासियांना लागली होती.

2045 च्या लोकसंख्येनुसार आराखडा…

कोल्हापूर शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5 लाख 49 हजार इतकी आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या 6 लाखांवर गेली आहे.2045 सालात हीच लोकसंख्या 10 लाख 29 हजार होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार दैनंदिन 238 द. श. लि. इतकी पाण्याची आवश्यकता लागेल. त्यानुसारच थेट पाईपालाईन योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काळम्मावाडी धरणातील एकुण पाणी साठ्यापैकी 2.3 टी. एम. सी. (76.85 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

महापालिकेचा हिस्सा 148 कोटी…

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी एकुण किंमतीपैकी 60 टक्के केंद्र शासन, 40 टक्के राज्य शासन, आणि 40 टक्के महापालिका असा हिस्सा आहे. 423 कोटींची योजना मंजूर असल्याने केंद्र शासनाचा हिस्सा 256 कोटी आहे. राज्य शासन आणि महापालिकेचा हिस्सा प्रत्येकी 83 कोटी 60 लाख इतका आहे. 15 टक्के जादा दराने निविदा मंजूर झाल्याने उर्वरीत 65 कोटी महापालिकेला भरावे लागणार आहेत. अशाप्रकारे एकुण योजनेत महापालिका हिस्सा 148 कोटींचा आहे. (Kolhapur News)

'पुढारी'चा पाठपुरावा

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी दै. 'पुढारी'ने सर्वप्रथम केली होती. शहराला पाणीपुरवठा करणारी पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे संपूर्ण शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्या पार्श्वभूमीवर 'पुढारी'ने योजनेचा पाठपुरावा करून ही मागणी सातत्याने लावून धरली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news