Warner vs Kohli : वॉर्नरची कोहलीशी बरोबरी! एका शतकाच्या जोरावर पाच दिग्गजांना टाकले मागे

Warner vs Kohli : वॉर्नरची कोहलीशी बरोबरी! एका शतकाच्या जोरावर पाच दिग्गजांना टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Warner vs Kohli David Warner Century : डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. एवढेच नाही तर त्याने आपला जोडीदार मिचेल मार्शच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 259 धावांचे योगदान देऊन ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी सलामी दिली. याआधी शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांनी 2011 मध्ये 183 धावांची सलामी भागिदारी केली होती. वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकातील पाचवे शतक झळकावून एक अद्भुत विक्रम रचला असून एकादमात त्याने पाच महान खेळाडूंना मागे टाकले आहे. वॉर्नरने 124 चेंडूत 14 चौकार आणि 9 षटकारांसह 163 धावांची वादळी खेळी साकारली. (Warner vs Kohli)

सौरव गांगुलीसह पाच दिग्गजांना टाकले मागे

याआधी वनडे वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुली (भारत), एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका), मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया), तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) आणि महेला जयवर्धने (श्रीलंका) यांनी प्रत्येकी चार शतके झळकावली होती. दरम्यान शुक्रवारी (20 ऑक्टोबर) पाक विरुद्ध विश्वचषकातील पाचवे शतक झळकावून वॉर्नरने या पाच महान खेळाडूंच्या पुढे झेप घेतली आहे. या यादीत रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा वॉर्नरच्या बरोबरीने आहेत. रोहित शर्मा पहिल्या तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या अव्वल फलंदाज

रोहित शर्मा : 7
सचिन तेंदुलकर : 6
डेविड वॉर्नर : 5
रिकी पोंटिंग : 5
कुमार संगकारा : 5

वॉर्नरने केली विराट कोहलीशी बरोबरी (Warner vs Kohli)

वॉर्नरचे हे पाकिस्तानविरुद्धचे सलग चौथे एकदिवसीय शतक ठरले. संपूर्ण जगात कोणत्याही संघाविरुद्ध सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर आहे. आता वॉर्नरने कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने 2017 ते 2018 या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध 4 शतके झळकावली होती. आता वॉर्नरने 2017 ते 2013 या कालावधीत सलग चार एकदिवसीय सामने खेळताना पाकिस्तानविरुद्ध शतक फटकावले आहे. वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीतील हे एकूण 21 वे शतक ठरले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news