पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या ब गटातील सामन्यात इराणने वेल्सचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. या सामन्यात इराणने 90 मिनिटांच्या नियमित वेळेनंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेत दोन गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह इराणचे तीन गुण झाले आहेत. तर वेल्सच्या खात्यात केवळ एक गुण जमा आहे.
इराणच्या रुबेज चेश्मीने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने इंज्युरी टाईममध्ये (90+8) गोल करून वेल्सला धक्का दिला. पेनल्टी एरिया बाहेरून फटकावलेला हा यंदाच्या विश्वचषकातील पहिला गोल आहे. आतापर्यंत झालेले सर्व गोल पेनल्टी एरियातून झाले आहेत. पहिला गोल केल्यानंतर इराणचा संघ थांबला नाही. त्यांनी आणखी एक गोल केला. रामीन रझियानने 90+11 व्या मिनिटाला गोलजाळे भेदले.
वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसीला सामन्याच्या 86 व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवण्यात आले. इराणचा स्ट्रायकर तारेमीला बॉक्सच्या बाहेर रोखण्यासाठी त्याने धोकादायकपणे पाय वर केल्याने रेफरींनी त्याच्यावर मोठी कारवाई केली आणि त्याला मैदाना बाहेरचा रस्ता दाखवला. हेनेसी हा रेड कार्ड मिळवणारा वर्ल्डकप इतिहासातील तिसरा गोलरक्षक ठरला. त्याआधी 1994 मध्ये इटलीचा गोलरक्षक जियानलुका पेग्लियुका याला नॉर्वेविरुद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या इटुमलेंग कुनेला 2010 मध्ये उरुग्वेविरुद्ध रेड कार्ड मिळाले होते.