मॉस्को, वृत्तसंस्था : वॅगनर या खासगी लष्कराचा प्रमुख प्रिगोझीन आता बेलारूसच्या आश्रयाला गेला आहे. अनेक गरीब आफ्रिकन देशात त्याचे साम्राज्य पसरले आहेत. याबाबत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सांगितले की, विदेशात असलेल्या वॅगनरच्या ऑपरेशनवर काहीच फरक पडलेला नाही. वॅगनरच्या लष्करी कारवाईपेक्षा रशियाला अधिक चिंता आहे ती वॅगनरच्या अफ्रिकन देशात पसरलेल्या कोट्यवधींच्या साम्राज्याची.
जगातील सर्वाधिक गरीब देश म्हणून ओळख असलेल्या सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकन पूर्णपणे वॅगनरच्या ताब्यात आहे. तेथील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीतून दरवर्षी 2 हजार 378 कोटी रुपयांची कमाई वॅगनर समूह करतो, वॅगनर समूह आणि प्रिगोझीनने अनेक कंपन्यांच्या माध्यमातून सुरक्षा आणि उत्खननाचे सर्व परवाने मिळवले आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकनची राजधानी बांगुईपासून 400 किलोमीटरवरील डेस्सिमा या सोन्याच्या खाणीत दोन वर्षांपूर्वी हाताने उत्खनन होत होते.
आता याठिकाणी वॅगनर समूहाने हेवी मशिनरींवर काम सुरू केले असून, तेथून दरवर्षी 4.2 टन सोने काढले जाते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 हजार 378 कोटी रुपये आहे. 2021 मध्ये वॅगनरने बोईस रोग सार्लु कंपनीच्या नावाने परवाना घेतला होता. त्याद्वारे 1.86 लाख हेक्टर वन क्षेत्रावर वॅगनरने ताबा मिळवला आहे. तेथे 27 एकरांमध्ये टिंबर मार्केट आहे. यातून वॅगनरकडून दरवर्षी 44 कोटी रुपयांची कमाई केले जाते. तेथून चीन, डेन्मार्क, फ्रान्स आणि पाकिस्तानला लाकूड निर्यात केले जाते. प्रसिद्ध बिअर टिलोर कंपनी वॅगनरकडून चालवली जाते.
समाज कार्यात अग्रभागी
वॅगनर समूहाने अनेक सामाजिक कामे केली आहेत. बांगुईतील रशियन भवनात रशियन भाषेचा अभ्यासक्रम चालविला जातो. याठिकाणी समूह रेडिओ स्टेशन चालविले जाते आणि सौंदर्य स्पर्धांना वॅगनरकडून स्पॉन्सर केले जाते. 2021 मध्ये टूरिस्ट सिनेमा पाहण्यासाठी बांगुई स्टेडिअमध्ये हजारो लोक उपस्थित होते.