वॉशिंग्टन : अंतराळ यात्रेवर रवाना झालेल्या 'नासा'च्या 'व्होएजर-1' यानातून संदेश येणे आता बंद झाले असून, यामुळे 'नासा'ची चिंता अर्थातच वाढली आहे. 'नासा'चे 'व्होएजर-1' यान पृथ्वीतलापासून 24 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तिथवर संदेश पाठवण्यासाठीदेखील तब्बल 22.5 तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. यानातील एका संगणकातील दुरुस्तीमुळे 46 वर्षे जुन्या असलेल्या या अंतराळ मोहिमेतील पथकाचा संपर्क तुटलेला आहे. 'नासा'चे अभियंते सध्या ही समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हे अंतराळयान अंतराळात आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर असलेल्या ठिकाणाच्या शोधार्थ रवाना केले गेले आहे. आजवर जेथे कोणीही पोहोचू शकलेले नाही, तिथवर पोहोचण्याची या यानाची योजना आहे. 'व्होएजर-1' असे अंतराळ यान आहे, जे सर्वाधिक दूर 24 अब्ज किलोमीटरवर पोहोचले आहे.
याच मोहिमेतील आणखी एक भाग असलेले 'व्होएजर-2' या यानाने आतापर्यंत 20 अब्ज किलोमीटर इतके अंतर कापलेले आहे. या दोन्ही यानांनी अंतराळाचा बराचसा भाग पार केला असून, ती सक्रियदेखील राहिली आहेत. या यानांत 3 संगणक आहेत. शिवाय, एक फ्लाईट डेटा सिस्टीमही कार्यरत आहे.
या फ्लाईट डेटा सिस्टीमच्या माध्यमातून शास्त्रीय उपकरणांच्या माध्यमातून माहिती एकत्रित केली जाते आणि इंजिनिअरिंग डेटाला जोडले जाते. याच माध्यमातून 'व्होएजर-1'ची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मिळू शकली आहे. पृथ्वीवर मिशन कंट्रोलशी संलग्न बायनरी कोडच्या रूपात 'व्होएजर'शी संपर्क केला जातो. मात्र, फ्लाईट डेटा सिस्टीम आता ऑटो रिपीटमध्ये अडकली आहे. 'नासा'च्या शास्त्रज्ञांना यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी याचे पूर्वसंकेत मिळाले होते.
'व्होएजर-1'ने एकाच पॅटर्नमध्ये संदेश पाठवले आहेत. आताही 'नासा'कडून येणारे कमांड तेथे प्राप्त होऊ शकतात. मात्र, 'व्होएजर'कडून कोणतेही संदेश इथवर पोहोचत नाहीत, ही 'नासा'ची खरी चिंता आहे. 'व्होएजर'च्या पथकाने फ्लाईट डेटा सिस्टीमला रिस्टार्टची कमांड दिली आहे; पण त्याचाही काही फरक पडलेला नाही, असे दिसून आले आहे. यापूर्वी 1981 मध्ये अशाप्रकारची समस्या 'व्होएजर-1'मध्ये आली होती.