मतदार एक; पण ओळखपत्रे दोन राज्यांची

मतदार एक; पण ओळखपत्रे दोन राज्यांची

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सीमावर्ती भागात नागरीक एका राज्याचे आणि त्यांची शेती दुसर्‍या राज्यात असल्याचे प्रकार आढळतात. पण, तब्बल 14 गावांतील लोक दोन राज्यांचे नागरीक असून त्यांना दोन्हीकडील सवलती मिळतात. त्यांच्याकडे दोन्हीकडची मतदान ओळखपत्रे असून ते दोन्हीकडे मतदान करत असल्याची बाब महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जितवी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमधील 14 ग्रामपंचायतींत सीमावाद रंगला आहे. या चौदा गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे, या गावांना दोन्ही राज्यांच्या सवलती देण्यात येतात. जितवी तालुक्यातील परंडोली आणि तेलंगणाच्या असिफाबाद जिल्ह्यातील केरामेरी ग्रामपंचायतीतील पाच हजार लोक दोन्ही राज्यांतील सरकारी सवलती मिळवतात. त्यापैकी 3,023 जणांकडे दोन्ही राज्यांचे मतदान ओळखपत्र आहे. ते दोन्ही राज्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करत आले आहेत. आता तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीही हे लोक मतदान करणार आहेत.

मतदार ओळखपत्रांबरोबरच रेशन कार्ड, रोजगार हमी योजनेचे कामगार कार्ड दोन्ही राज्यांकडून देण्यात आले आहे. इतकेच काय तर ग्रामपंचायतीतही प्रत्येकी दोन सरपंच आहेत. यामुळे येथील लोक दोन्ही राज्यांचा शिधा आणि इतर सरकारी सवलती मिळवत आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने या गावांत वेगळ्या शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालये सुरु केली आहेत. भागात 80 टक्के मराठी भाषिक आहेत. पण, महाराष्ट्रापेक्षा तेलंगणाकडून अधिक मदत मिळते, अशी लोकांची भावना आहे.

दोन मतांचा अधिकार कसा?

1956 मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यापासून हा वाद आहे. 1989 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने या भागात मत केंद्रांची स्थापना केली. 1999 मध्ये उच्च न्यायालयाने ही 14 गावे आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्याचा आदेश दिला. त्याला महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे. 1989 मध्ये येथील लोकांना आंध्र प्रदेशातील मतदार ओळखपत्रे मिळाली.लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने एकाच मतदारसंघांसाठी मतदान करावे, असे आवाहन केले. पण, काही लोकांनी महाराष्ट्रातील मतदारसंघासाठी तर काही तेलंगणातील मतदारसंघासाठी मतदान केले. काहींनी दोन्हीकडे मतदान केले. त्यामुळे, आतापर्यंत या वादावर तोडगा निघाला नाही. आम्हाला दोन्हीकडे मतदान करायचे आहे. दोन्हीकडच्या सवलती पाहिजेत, असे लोक सांगतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news