निवडणुकांच्या रणधुमाळीत येतोय ‘धर्मवीर’!

निवडणुकांच्या रणधुमाळीत येतोय ‘धर्मवीर’!

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनावतार चितारणार्‍या 'धर्मवीर' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आणि ट्रेलर सोशल मीडियावर पडू लागले. याचा अर्थ निवडणुकांचे पडघम वाजू लागले, असाच काढला जात आहे. मात्र, आता पडद्यावर येताना या चित्रपटानेही धर्मवीरांच्या मृत्यूबद्दल सतत उठणार्‍या किंवा उठवल्या जाणार्‍या राजकीय वावड्यांवर पडदा टाकावा, अशी अपेक्षा आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा ट्रेलर झळकला आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले, असा तर्क लावला गेला. या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना धर्मवीरांची जयंती यंदा प्रथमच दूरचित्रवाहिन्यांवरही विस्ताराने दाखवली गेली. शक्तिस्थळावर दरवर्षी गर्दी होते. मात्र, माध्यमांनी त्याची इतकी दखल कधी घेतली नव्हती. शिवसेनेनेही दिघे साहेबांच्या आरमाडा गाडीचे दर्शन प्रथमच घडवले; अन्यथा वर्तकनगरच्या एका गॅरेजमध्ये ही गाडी ठेवलेली होती. तिचे रंगरूप आता पालटले आहे.

आनंद दिघे जिथे बसून आपले सरकार चालवत, त्या आनंदाश्रमाचाही कायाकल्प होऊ घातला आहे. तो पूर्ण झाल्यानंतर तिथे म्हणे ही गाडी ठेवली जाणार आहे. 27 जानेवारीला ठाण्यातील शक्तिस्थळाला शिवतीर्थासारखे महत्त्व लाभले. दिवसभर बातम्या वाजल्या. ठाणेकरांना पुन्हा आपले 'साहेब' आठवले. याचे कारण 2001 च्या ऑगस्टमध्ये धर्मवीरांचा अकस्मात मृत्यू झाला. दवाखाना पेटवून देण्यापर्यंत शिवसैनिकांचा उद्रेक तेव्हा महाराष्ट्राने पाहिला. धर्मवीरांचा मृत्यू नैसर्गिक होता की अनैसर्गिक, या प्रश्नाची चर्चा सतत होत आलेली आहे. दोन वर्षांखालची गोष्ट. आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासविण्यात आले, असा आरोप नीलेश राणे यांनी करताच पहिला खुलासा केला तो त्यांचे पिताश्री नारायण राणे यांनी. अपघातानंतर आनंद दिघेंना भेटणारा मी शेवटचा माणूस होतो. मी भेटलो तेव्हा धर्मवीरांची परिस्थिती नाजूक होती.

डॉक्टरांचे पथक त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मी बाळासाहेबांना फोन केला. डॉ. नीतू मांडकेंना पाठवा, अशी विनंती केली. बाळासाहेबही डॉक्टर मांडके यांच्याशी बोलले. मांडके यांचा मलाही फोन आला. मात्र, डॉ. मांडके ठाण्याकडे येण्याआधीच दिघे यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हे, असे जे आरोप होत आहेत त्यात तथ्य नाही. या विषयावर आता कायमचा पडदा पडला आहे, असेही राणे यांनी निक्षून सांगितले. वास्तव काय आहे, याची कल्पना नीलेश राणे यांना देईन, असेही नारायण राणे म्हणाले होते. नारायण राणे पिता-पुत्रांचे हे अवतरण देण्याचे कारण म्हणजे धर्मवीरांच्या जीवनकार्याइतकीच त्यांच्या मृत्यूची उलट-सुलट चर्चा सतत होत आली आहे. खास करून शिवसेनेची अडचण करण्यासाठी ही चर्चा नेहमी डोके वर काढते. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता 'धर्मवीर' चित्रपटाची राजकीय चर्चा सुरू होणे खूप साहजिक म्हणायचे. या चित्रपटाचा संबंध निवडणुकीशी नसला तरी तो जोडला जाणेही अनैसर्गिक नाही.

2001 ते 2008 या संपूर्ण काळात धर्मवीरांची जयंती ही शाखांपुरती मर्यादित असायची. शाखांवर बॅनर लागत. थोडेबहुत कार्यक्रम होत. गेल्या गुरुवारी शक्तिस्थळाला जितकी स्क्रीन स्पेस वृत्तवाहिन्यांनी दिली, तितकी यापूर्वी कधीच दिली नव्हती. 2009 ला धर्मवीरांचे पुतणे केदार दिघे यांनी धर्मवीरांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठान स्थापन केले. आनंद यात्रा सुरू केली आणि धर्मवीरांच्या जयंतीचा एक वार्षिक उत्सव सुरू झाला. यंदा मात्र आनंदाश्रमाचा जीर्णोद्धार सुरू आहे. धर्मवीरांची आरमाडाही आनंदाश्रमात पार्क केली जाईल आणि आता धर्मवीरांचा जीवनावतार चितारणारा 'धर्मवीर' हा चित्रपट पडद्यावर येऊ घातला आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटाचा निर्माता असला तरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याशिवाय ही निर्मिती शक्य नाही, हे वेगळे सांगायला नको. आता या चित्रपटानेही धर्मवीरांच्या मृत्यूबद्दल सतत उठणार्‍या किंवा उठवल्या जाणार्‍या राजकीय वावड्यांवर पडदा टाकावा, अशी अपेक्षा आहे.

चलो, शिवतीर्थ!

मुंबई महापालिकेच्या रणांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपरिहार्यपणे स्वबळावर उतरेल, अशी राजकीय स्थिती भाजपने अखेर निर्माण केलेली दिसते. मुंबईत मनसे विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली तर भाजपसह अनेक राजकीय पक्षांच्या नौका किनार्‍याला लागू शकतात. हा तसा ठोकताळा झाला. मनसे मैदानात उतरते तेव्हा ती शिवसेनेची जास्त मते खाते. मात्र, त्यासोबत ती भाजप आणि राष्ट्रवादीचीही मते खात आली आहे. 2017 च्या निकालानुसार मुंबईत सर्वाधिक 30.41 टक्के मतांचा टक्का हा शिवसेनेकडे आहे. त्या खालोखाल 28.28 टक्क्यांसह भाजपचा क्रम लागतो. 16.69 टक्क्यांसह काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर आहे.

मात्र, चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी नाही. 8.52 टक्के मते घेऊन हा चौथा क्रम मनसेने कमावला. मनसेचे एक सोडून बाकी सारे नगरसेवक शिवसेनेचे शिवबंधन बांधून मोकळे झाले असले तरी मतांचा हा टक्का आजही मनसेच्याच नावावर आहे. तो या निवडणुकीत वाढला तर मुुंबई महापालिकेची सारीच गणिते बदलू शकतात. राष्ट्रवादी 5.74 टक्के मते घेऊन मागच्या वेळी पाचव्या क्रमांकावर राहिली. थोडे वर सरकायचे असेल तर सेनेसोबत गेलेले बरे, असा सूर राष्ट्रवादीत आहे. शिवसेनेेचे बोट धरून राष्ट्रवादीच्या जागा वाढू शकतात; पण या दोन्ही पक्षांची मते खेचून मनसे मोठी गडबड करू शकते, हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. मनसे परप्रांतीयविरोधी पक्ष म्हणून भाजपला सोबत नको. मनसे मराठीचा हटवाद सोडत नाही, म्हणून काँग्रेसलाही तिचे वावडे.

शिवसेनेचा रोष नको म्हणून राष्ट्रवादीनेही मनसेला सोबत घेता घेता रस्ता बदलला आणि आता भाजपला मनसेचा वापर केवळ शिवसेनेविरोधात आणि तोही परस्पर करायचा आहे. त्यामुळे मनसेचा मराठी प्रांतवाद भाजपच्या राष्ट्रीय धोरणात बसत नाही, असे सांगून भाजपनेही युतीची शक्यता धूसर करून टाकली. अशा परिस्थितीत मुंबईत बहुरंग लढती होतील आणि त्यात मनसे विरुद्ध शिवसेना अशा दोन भगव्यांची टक्कर अटळ दिसते. पूर्वी 'कृष्णकुंज' विरुद्ध 'मातोश्री' असा हा सामना असे.

आता त्याचे प्रतीकात्मक स्वरूपही बदलले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आता 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानातून सूत्रे हलवतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कचा उल्लेख सतत शिवतीर्थ असाच केला. दसरा मेळावा असो की, निवडणूक सभा. 'चलो, शिवतीर्थ' असा नारा शिवसेनेत घुमायचा. आता असा नारा देण्याची सोय उरलेली नाही. 'चलो, शिवतीर्थ' म्हणायचे आणि शिवसैनिक राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचायचे! शिवसेनेला आता नवा नारा शोधावा लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news