मराठी हृदयसम्राट, साम्राज्य कुठे आहे ?

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

विवेक गिरधारी

मुंबई महापालिकेची निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर लढवली जाईल का? आणि हा मुद्दा घेऊन रिंगणात उतरणारा जिंकेल का? या प्रश्‍नांची उत्तरे फारशी आशादायक नाहीत. मराठीच्या मुद्द्यावर मुंबईची सत्ता जिंकता येत नाही, हे लक्षात येताच शिवसेनेने उत्तर भारतीयांची छटपूजा मांडणे सुरू केले. त्यांचे मेळावे भरवणेही सुरू केले. आता तर उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत शिवसेना प्रचाराचा गुलाल उधळून आली. तिथे शिवसेना नेहमीच डिपॉझिट गमावत आली. यावेळेस एखादी जागा मिळाली तरी मुंबईत मराठीचे बोट सोडून उत्तर भारतीयांचे लांगूलचालन केल्याचा फायदा शिवसेनेला झाला, असे म्हणता येईल.

उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत शिवसेनेचे नवे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी जी भाषणे केली, त्यातील एक मुद्दा मराठी मुंबईने नोंद घ्यावा असा आहे. 'उत्तर प्रदेशातील अनेक नागरिक मुंबई अन् महाराष्ट्रात आहेत. या उत्तर भारतीयांची जबाबदारी आमची,' असा शब्द आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील मतदारांना दिला. असा शब्द त्यांनी मुंबईतील मराठी भाषिकांना दिल्याची कुठेही नोंद नाही. आदित्य यांच्या या विधानाची दखल घेत, 'मराठी बोला चळवळी'ने दिलेली प्रतिक्रिया प्रातिनिधिक ठरावी.

'बहुतांश ट्विट इंग्रजीत करणार, फलक ऊर्दू आणि गुजरातीत लावणार, जबाबदारी उत्तर भारतीयांची घेणार… मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचे काय?' असा सवाल 'मराठी बोला चळवळी'ने उपस्थित केला. याचे उत्तर मागायला जाल तर शिवसेना मराठीसाठी कशी झुंजली, याचा इतिहास ऐकवला जाईल. मात्र, मुंबईतील शिवसेनेच्या पावशतकी राजवटीत मराठी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मराठीचे हे अस्वस्थ वर्तमान कुणाला सांगायचे? शिवसेनेचे युवराज इंग्रजीत शिकले. आता मुंबई महापालिकेने मराठी नव्हे, तर इंग्रजी शाळा सुरू कराव्यात असे त्यांना वाटते. गेल्या आर्थिक वर्षात केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या 12 इंग्रजी शाळा महापालिकेने सुरू केल्या.

यंदा पालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात आणखी दोन शाळा सुरू करण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मराठी शाळांसाठी काय? जर्जर झालेली म्हातारी काठी टेकवत चालते आणि ती काठीही कधी मोडून पडेल याचा नेम नाही, अशी अवस्था मुंबईतल्या मराठी शाळांची झाली आहे. अशा 36 शाळा जर्जर झाल्या आणि त्या कधीही कोसळतील. या शाळांच्या डागडुजीसाठी दीडशे कोटींचा प्रस्ताव तयार झाला. मात्र, कोरोनाचे कारण देत तिजोरीत पैसाच नाही, असे सांगत हा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला.

दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी 12 इंग्रजी शाळा सुरू करताना कुठेही काही कमी पडणार नाही, याची काळजी पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांनी सर सर करीत घेतली. मराठीचा दुस्वास आणि इंग्रजीचा पुळका इथे थांबत नाही. सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकही म्हणजे 100 टक्के इंग्रजीत शिकलेलेच हवेत. जसे काही मराठीत शिकलेली मुले इंग्रजी बोलू, लिहू शकत नाहीत. या शाळेतील भरतीसाठी दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दीडशे मराठी शिक्षक पालिकेने अपात्र ठरवले. का? तर ते इंग्रजी माध्यमात शिकलेले नाहीत. या शिक्षकांनी सत्तेचे आणि विरोधकांचे सारे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्या बाजूने कुणीही उभे राहिले नाही.

'मराठी शाळेत शिकलात म्हणून मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळेत शिकवण्यास तुम्ही अपात्र आहात,' असा नियम मुंबई महापालिकेने या मराठी भूमिपुत्रांच्या तोंडावर फेकला आणि महापालिकेचे मराठीवर असे थुंकणे गुमान सहन केले गेले. कुणालाही त्याचे काही वाटले नाही. गेल्या सहा वर्षांत मंजुरी मिळालेल्या 14 हजार शाळांपैकी सर्वाधिक 11 हजार शाळा इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी शाळांची संख्या फक्‍त 2 हजार 124 आहे. तिजोरीवर मराठीचा भार नको म्हणून राज्य सरकारनेही इंग्रजीला पायघड्या घातल्या.

मुंबई महापालिका त्याच दिशेने फार पुढे गेली. इंग्रजी शाळांसाठी दौलतजादा करताना मराठी शाळा कशा आडव्या होतील याची संपूर्ण व्यवस्था पालिकेचे प्रशासन करताना दिसते. याच महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी उद्या झाडून सारे पक्ष मैदानात उतरतील तेव्हा शिवसेनेचा नारा मराठी असण्याचे कारण नाही. मराठी माणूस आपल्या शाखांशी कायमचा बांधला गेला आहे. आता काळजी घ्यायची ती उत्तर प्रदेशच्या नागरिकांची. तशी जबाबदारी घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर प्रदेशात जाऊन सांगितले.

बाकी पक्षांचे राजकारण तसे बहुभाषिक. त्यांच्याकडूनही मराठीचा कैवार घेतला जाणे अपेक्षित नाही. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष फक्‍त मराठीचे राजकारण आतापर्यंत करत आला. शुद्ध मराठी राजकारण करण्याची एक किंमत मुंबईत मोजावी लागते. ती म्हणजे सत्तेचे समीकरण मांडण्याइतक्या जागा आणि मते मराठी माणूस देत नाही. तरीही मनसेने ही किंमत मोजली. ती मोजून निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेेने पळवले आणि मनसेकडे फक्‍त एकच नगरसेवक नावाला तेवढा ठेवला हा भाग वेगळा.

शिवसेनेने मनसेचे नगरसेवक पळवले, मनसेला मिळालेली मते मात्र शिवसेनेने पळवली, असे म्हणता येत नाही. त्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या राज्यात मराठीची अशी दुर्दशा सुरू असताना मनसे आक्रमक होईल, लढे उभारेल, अशी अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. महापालिका निवडणुकीच्या तुतार्‍या हळूहळू मोडतोड झालेल्या प्रभागांमधून वाजू लागल्या आणि मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्‍लेख 'हिंदू हृदयसम्राट' असा करण्यात आला. खुद्द राज यांनाही ते आवडले नाही.

शिवसेनाप्रमुखांनंतर या महाराष्ट्रात किंवा देशात पुन्हा हिंदू हृदयसम्राट होणे नाही, हे कुणीही सांगेल. त्यामुळे मनसेने तातडीने दुरुस्ती करीत फर्मान काढले आणि आपल्या मनसैनिकांना बजावले की, राज ठाकरे यांच्या नावापुढे फक्‍त 'मराठी हृदयसम्राट' असे लिहा, अन्य कोणत्याही उपाध्या लावू नयेत. 'मराठी हृदयसम्राट' ही उपाधी ऐकायला चांगली वाटते. हिंदू देशभर पसरला आहे.

मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या पलीकडे अन्य राज्य नाही. या मराठी माणसाचा कैवार घेणारा सम्राट असायला हरकत नाही. मात्र, साम्राज्य असेल तर सम्राट म्हणून मिरवण्यात काही अर्थ; अन्यथा ओसाड गावचे राजे होण्यात तसा अर्थ नाही. शिवसेनेने उत्तर भारतीयांची जबाबदारी घेतली. मनसेने आता मराठी माणसांची जबाबदारी घ्यावी. मराठी भाषेचे, मराठी माणसाचे अधिपत्य या मुंबईवर कायम राहिले तर अशा उपाधीला काही अर्थ उरेल; अन्यथा लोक विचारतील, मराठी हृदयसम्राट, तुमचे साम्राज्य कुठे आहे?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news