Vitamin D : कमतरता ‘डी’ जीवनसत्त्वाची

Vitamin D : कमतरता ‘डी’ जीवनसत्त्वाची
Published on
Updated on

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अंगावर कोवळे ऊन घेण्यासाठी सकाळी लवकर उठून फिरायला जाणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु, अलीकडील काळात अनेक जण उन्हापासून चार हात लांब राहताना दिसतात. पण, अंगावर ऊन पडू देत नसाल; तर आपली हाडे आणि स्नायू कमजोर होऊ शकतात. तसेच मधुमेह, हार्ट अ‍ॅटॅक आणि कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता असते.

भारतातील डॉक्टरांनी मध्यंतरी केलेल्या एका संशोधनानुसार, देशातील सुमारे 70 ते 90 टक्केलोकसंख्येमध्ये 'डी' जीवनसत्त्वाची कमतरता आहे. सूर्यप्रकाशाच्या काळात घराबाहेर न पडल्यामुळे ही रुग्णांची संख्या वाढते आहे. एवढेच नाही तर उन्हाचा त्वचेला त्रास होऊ नये म्हणून बहुतांश लोक क्रीम लावून बाहेर पडतात. या क्रीममुळे उन्हाचा त्वचेशी संपर्क होत नसल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. त्यामुळे 'डी' जीवनसत्त्व शरीराला मिळू शकत नाही.

भारतात सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात आहे. सर्वसाधारणपणे भारतातील लोकांना 'डी' जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही, असे मानले जाते; मात्र हे सत्य नाही. भारतात खूप प्रमाणात लोक 'डी' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. भारतीय लोकांमध्ये 'डी' जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत.

शरीराला उन्हाचा फायदा मिळावा म्हणून शरीराचा एक-तृतीयांश भाग उघडा राहणे गरजेचे आहे. पण, बहुतांश भारतीयांत शरीर झाकून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरे महत्त्वाचे काऱण म्हणजे बैठ्या कामाचे प्रमाण वाढले आहे. वातानुकूलित ऑफिसात बसून लोक दिवसभर बैठी कामेच करतात आणि रात्री घरी जातात. या जीवनशैलीत उन्हात बाहेर पडण्याचा काही प्रश्नच येत नाही किंवा तशी संधीही मिळत नाही. त्यामुळे या लोकांना आरोग्यासाठी गरजेचे असलेल्या उन्हाचे फायदेही मिळत नाहीत. त्याव्यतिरिक्तही 'डी' जीवनसत्त्वाचा अभाव असण्याची काही कारणे आहेत. जसे, त्वचेचा रंग खूप गडद असणे. या रंगाच्या त्वचेत मेलानिनचे प्रमाण जास्त असते. मेलानिन अतिनील किरणांना त्वचेत शोषून घेण्यापासून रोखते.

आतापर्यंत उन्हाचे फायदे पाहताना सर्वात प्रचलित गोष्ट हीच होती की, सूर्यप्रकाशात 'डी' जीवनसत्त्व असल्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात. तसेच हाडे आणि सांधे यांच्या विकासासाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे मुडदूससारख्या आजारांपासून बचाव होतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये नव्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, उन्हाचा उपयोग इतरही अवयवांच्या विकासासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ – उन्हामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते, असे काही अभ्यासकांनी म्हटले आहे.

दर दिवशी योग्य प्रमाणात ऊन अंगावर घेतल्यास क्षयरोग होण्याची शक्यता दूर होते. उन्हामुळे मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडतो. तसेच नैराश्य दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ऊन अंगावर घ्यावे. ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे. सूर्यप्रकाश जेव्हा डोळ्यांवर येतो तेव्हाही डोळ्यातील रेटिनाचा काही भाग सक्रिय होतो. त्यामुळे शरीरात सेरोटोनिन स्रवते. त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा शरीरात पसरते, त्यामुळे आपली मनोवस्था चांगली करते आणि आनंदी, उल्हसित वाटते.

* सामान्यतः 10 ते 20 नॅनोग्रॅम एवढे 'डी' जीवनसत्त्व शरीराला मिळाले पाहिजे.
* देशात 10 टक्के शहरी लोकसंख्येला 'डी' जीवनसत्त्वाची कमतरता भासते आहे, असे दिसून आले आहे.

उन्हामुळे शरीराला 'डी' जीवनसत्त्व मिळते. जे शरीरासाठी आवश्यक असतेच; परंतु सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त त्याचा नैसर्गिक स्रोत नाही. शरीरात डी जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास हाडे कमजोर होतात. नवजात बालकांमध्ये काविळीची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना रोज कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवले पाहिजे. हृदय रोग्यांव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांनीही हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यातही अंगावर ऊन घेतले पाहिजे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी योग्य राहण्यास मदत होते. तसेच संसर्गापासूनही त्यांचा बचाव होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news