Visit To Dajipur Sanctuary : पर्यटकांना खुणावतोय दाजीपूर अभयारण्य, नैसर्गिक गारवा अन् हिरवाई..!

Visit To Dajipur Sanctuary : पर्यटकांना खुणावतोय दाजीपूर अभयारण्य, नैसर्गिक गारवा अन् हिरवाई..!
Published on
Updated on

राशिवडे; प्रवीण ढोणे : निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर माणसाच्या मनावरील ताण हलका होतो. पर्यटन म्हटलं की राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी ही पर्यटनस्थळे नजरेसमोर येणे साहजिकच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हा धरणांचा तालुका विविध प्रकारच्या जैवसंपत्तीने नटलेला आहे. हवाहवासा वाटणारा गारवा, नेत्रदीपक हिरवाईमुळे उन्हाळी आणि पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक राधानगरीला हमखास भेट देतात. डोंगरचा रानमेवा, राधानगरीची प्रसिद्ध दूध-आमटी आणि चुलीवरचे गावरान मटण-भाकरी पर्यटकांच्या आनंदामध्ये भरच टाकतात. (Visit To Dajipur Sanctuary)

राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. दाजीपूर अभयारण्य येथून जवळ आहे. राधानगरी गाव भोगावती नदीवर वसले आहे. राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर दूरद़ृष्टीने लक्ष्मी धरण बांधले. सात स्वयंचलित दरवाजे असलेले हे देशातील एकमेव धरण मानले जाते. धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व जादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते. त्यामुळे धरणाला काही धोका पोहोचत नाही. राधानगरी हे एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले गाव आहे. (Visit To Dajipur Sanctuary)

हिरवाईने नटलेले राधानगरी कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यास एस. टी. बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला 1 तास वेळ लागतो. 'धरणाचा तालुका' अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर, रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणार्‍या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. दाजीपूर अभयारण्याचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. त्याचबरोबर अनेक देवराया आहेत. इथे अत्यंत दुर्मीळ अशा वनस्पतींसोबतच विविध वन्यप्राणीही मोठ्या संख्येने आहेत. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना गवा, सांबर यासारख्या वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ फुले पर्यटकांचे लक्ष वेधतात. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉईंटवरून दिसणारे सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे येणार्‍या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची अतिशय चांगली व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही मोठ्या प्रमाणात आहेत. (Visit To Dajipur Sanctuary)

राधानगरी हे तालुक्याच्या पश्चिम परिसरातील निसर्गसंपन्न गाव आहे. या गावापासून जवळच तुळशी नदी आहे. गगनबावडा येथे जाणारा पर्यटक याच मार्गाने जातो. लक्ष वेधून घेणारा सूर्यास्त पाहायला पर्यटकांची गर्दी होते. तुळशी जलाशय, ज्योतिर्लिंग मंदिर, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर, बगीचा प्रेक्षणीय आहे. तसेच कोते येथे प्राचीन पांडवकालीन मंदिरे आहेत. तुळशी जलाशयावर पर्यटकांचे सतत रेलचेल असते.

कसे जाल?

कोल्हापूर-रंकाळा बसस्थानकावरून दर तासाला एस.टी. बसेस आहेत. तर खासगी वाहनाने जायचे असेल तर रंकाळा, परिते, राशिवडे बु, शिरगाव ते राधानगरी तसेच भोगावती, गैबी मार्गानेही जाता येते. राधानगरीतून दाजीपूर अभयारण्य 26 किमी अंतरावर आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news