पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसामुळे खेळ थांबण्यात आला आहे. 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 11 षटकात 2 गडी गमावून 44 धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि इमाम उल हक बाद होऊन माघारी परतले आहेत. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत. भारतासाठी वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह आणि हार्दिकने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने राखीव दिवशी 50 षटकांत 2 बाद 356 धावा केल्या. विराट कोहलीने कारकिर्दीतील 47 वे वनडे शतक झळकावले. त्याने 94 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली. केएल राहुलने कारकिर्दीतील सहावे वनडे शतक झळकावले. त्याने 106 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या वनडेतील सर्वोच्च धावसंख्येची बरोबरी केली आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2005 मध्ये विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्ध 9 बाद 356 धावा केल्या होत्या. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धची ही भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2012 मध्ये मीरपूरच्या मैदानावर भारताने 330 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात कोहलीने 183 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.
केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याने अडीच वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभर धावांचा टप्पा पार केला. राहुलने अखेरची 108 धावांची खेळी 26 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळली होती. पाकिस्तानशिवाय त्याने इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येकी 1 शतक झळकावले आहे.
आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सुपर 4 फेरीतील सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर राखीव दिवशी खेळवला जात आहे. सामन्याला 4.40 वाजता सुरुवात झाली. टीम इंडियाने कालच्या 24.2 षटकात 2 बाद 147 धावांच्या पुढे खेळ सुरू केला. राखीव दिवशीही सामना सुमारे दीड तास उशीराने सुरू झाला. मात्र, सामन्यातील षटकांमध्ये कपात करण्यात आली नाही.
लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. राहुल आक्रमक फलंदाजी करत आहे आणि विराट एका टोकाला संयमाने फलंदाजी करत आहे. राहुलने 50 धावा पूर्ण केल्या. त्याने 60 चेंडूत कारकिर्दीतील 14 वे अर्धशतकी खेळी साकारली, तर विराटही अर्धशतकाच्या जवळ आहे. हे दोघे मिळून वेगाने धावा काढत आहेत. 36 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 228 होती.
तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत असून त्यांनी 71 चेंडूत 50 धावा जोडल्या.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. रौफने या सामन्यात पाच षटके टाकली असून 27 धावा मोजल्या आहेत. जर त्याने गोलंदाजी केली नाही तर त्याच्या जागी इफ्तिखार अहमद किंवा इतर कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करावी लागेल आणि याचा फायदा भारतीय फलंदाज घेऊ शकतात. रौफ पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो खेळल्यास त्याची दुखापत आणखी वाढू शकते. पाकिस्तानी संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी रौफला दुखापत करू इच्छित नाही. यामुळे तो आज गोलंदाजी करणार नाही.
रविवारी पहिल्या दिवशी सामना थांबण्यापूर्वी प्रथम खेळणाऱ्या टीम इंडियाने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद होते. त्या आधी सलामीवीर शुभमन गिल 58 धावा करून बाद झाला. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक ठरले. गिलने 52 चेंडूत 10 चौकार मारले. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला सलमान अली आगाकरवी झेलबाद केले. तर कर्णधार रोहित शर्मा (56 धावा) फहीम अश्रफच्या हाती शादाब खानकरवी झेलबाद झाला.