पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला उद्या ( दि. २८) होणार आहे. या
सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणार का? याकडे देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. कारण मागील काही दिवस खराब फॉर्ममुळे विराट दमदार कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौर्यावेळी त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता खराब फॉर्म आणि एक महिन्याच्या ब्रेकबाबत विराट कोहलीआपलं मौन सोडले आहे. ( Virat Kohli breaks silence )
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहली म्हणाला की, "मला क्रिकेटपासून काही काळ ब्रेक घेणे आवश्यक होते. गेली दहा वर्षांमध्ये मी प्रथमच क्रिकेटपासून लांब राहिलो. या काळात मी बॅट हातात घेतली नाही. मागील काही महिन्यांमध्ये खेळा प्रतीची तीव्रता गायब झाली होती. ती पुन्हा परत आणण्यासाठी एक ब्रेक घेणे आवश्यक होते. "
मी मानसिक दृष्ट्या अत्यंत कणखर असल्याचे मानले जाते. आणि मी खरोखरच मानसिक दृष्ट्या कणखर आहे. प्रत्येक
व्यक्तीच्या मानसिक शक्तीची एक सीमा असते. तुम्हाला ती सीमा ओळखता येणे आवश्यक असते. यामध्ये तुम्ही कमी पडला तर परिस्थिती तुमच्याविरोधात जाते, असेही विराटने या वेळी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये विराटने म्हटलं आहे की, मी सतत जागृत राहणारा व्यक्ती आहे. आजचा दिवस माझ्यासाठी काय घेऊन आला आहे, हे मी पाहतो. तुम्ही आनंदाने प्रत्येक गोष्ट स्वीकारा. तुला हे कसे काय जमते? असा प्रश्न लोक मला विचारतात. यावेळी मी त्यांना सांगतो की, "मला हा खेळ खूप प्रिय आहे. तसेच मला टाकल्या जाणार्या प्रत्येक चेंडूला योगदान देण्यासाठी माझ्याकडे खपू काही आहे. प्रत्येक सामन्यात मी माझे १०० टक्के योगदान देतो."
२०१९ मध्ये कोलकाला येथे बांगलादेश विरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. यानंतर तो शतकी खेळीपासून वंचितच राहिला आहे. आता आशिया चषक स्पर्धेत पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट तळपेल, असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत.