पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा संदेश बनावट

पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा संदेश बनावट

पुणे : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहर आणि परिसरात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश मंगळवार २३ मे रोजी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. मात्र, असे कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. त्यामुळे हा व्हायरल संदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उद्यापासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट कारवाई होणार आहे. त्याकरिता ६०० अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. सर्वांनी सतर्क राहावे, असा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना विचारले असता, हा संदेश बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येताना हेल्मेट परिधान करावे. हेल्मेट परिधान करून न येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुरुवातीला प्रबोधन करावे. त्यानंतर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिला आहे. मात्र, सामान्य नागरिकांबाबत असे कोणतेही आदेश या बैठकीत देण्यात आलेले नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news