Vinayak Raut on Narayan Rane: उद्योग खात्याचे कार्यालय आपल्या इमारतीत थाटून नारायण राणे दीड लाख भाडे घेतायेत : विनायक राऊत

Vinayak Raut on Narayan Rane: उद्योग खात्याचे कार्यालय आपल्या इमारतीत थाटून नारायण राणे दीड लाख भाडे घेतायेत : विनायक राऊत

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे कार्यालय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या इमारतीत थाटून तब्बल दीड लाख रूपयांचे भाडे ते घेत आहेत. म्हणजेच राज्यात लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचा पहिला लाभार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. याबाबत आपण निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. Vinayak Raut on Narayan Rane

काँग्रेससोबतची आपली युती यापुढील निवडणुकांमध्ये कायम टिकली पाहिजे. तसेच या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी करत काँग्रेसचा पंतप्रधान होण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले. Vinayak Raut on Narayan Rane

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची विशेष बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे शुक्रवारी (दि.१२) संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ.वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, मंदार शिरसाट, नागेश मोर्ये, अमरसेन सावंत, महेंद्र सांगेलकर, श्रीकृष्ण तळवणेकर, अभय शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, सुगंधा साटम, प्रदिप मांजरेकर, मेघनाथ धुरी, बाळू अंधारी, विजय प्रभू आदी उपस्थित होते.

यावेळी खा. राऊत म्हणाले की, ही निवडणूक माझी एकट्याची नाही, तर आपल्या घटनेच्या रक्षणासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. सत्तेतील लोकांना सत्तेचा माज आलेला आहे. लोकशाहीचे खरे मारेकरी सत्ताधारी आहेत. त्यांना रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आता आपल्याशी गद्दारी करणार्‍यांना आपण गाढायचे आहे. आपली ही शक्ती निष्ठांवतांची शक्ती आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले की, काहींनी काँग्रेसची सत्ता असताना सत्तेचा उपभोग घेतला. आज ते भाजपमध्ये आहेत आणि सत्तेचा उपभोग घेत आहेत, अशी टीका त्यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर केली. एकदिलाने काम करत हुकुमशाहीच्या वनव्याला बाजूला करून लोकशाही अबाधित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

इर्षाद शेख म्हणाले की , काँग्रेस संपलेली नाही, यापुढे ही काँग्रेस अधिकच अबाधित राहील. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकदिलाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. विनायक राऊत हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्या विजयासाठी काँग्रेसचा पदाधिकारी, कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी विजय प्रभू, मेघनाथ धुरी आदींनी मनोगत व्यक्त केले.

Vinayak Raut on Narayan Rane : विनायक राऊतांना ताकदीने निवडून आणूया :  बंटी पाटील

काँग्रेस कमिटीच्या बैठकी दरम्यान काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना आ. वैभव नाईक यांनी फोन लावला. यावेळी सतेज पाटील यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधुन ताकदीने निवडून आणूया, त्यासाठी सर्वांनी एकसंघ राहा, असे आवाहन केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news