पुणे: ‘महिंद्रा’साठी शिवतारेंची नागपुरात ‘फिल्डिंग’; पुरंदर, भोर किंवा दौंडमध्ये प्रकल्पाची मागणी

पुणे: ‘महिंद्रा’साठी शिवतारेंची नागपुरात ‘फिल्डिंग’; पुरंदर, भोर किंवा दौंडमध्ये प्रकल्पाची मागणी

सासवड, पुढारी वृत्तसेवा: प्रसिद्ध वाहन निर्मिती कंपनी 'महिंद्रा'च्या प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नागपुरातून 'फिल्डिंग' लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटी घेत शिवतारे यांनी हा प्रकल्प पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात खेचण्यासाठी जोर लावला आहे.

याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महिंद्रा उद्योग समूह त्यांचा स्वतंत्र इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी औद्योगिक प्रोत्साहन योजने अंतर्गत मंजुरी मागितली होती. शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली असून हा प्रकल्प पुरंदर, भोर किंवा दौंड मतदारसंघातील एमआयडीसी क्षेत्रात व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. यापैकी कुठल्याही तालुक्यात झाला तरी पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा, दौंड, इंदापूर, बारामती अशा तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे.

जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक महिंद्रा या प्रकल्पासाठी करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन उद्योग गेल्या काही दिवसापासून भरभराटीला येत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना फाटा देऊन लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात या उद्योगाला चांगले भविष्य आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्मिती होणार आहे. पुण्याच्या बाजूला चाकण, हिंजवडी, खराडी, तळवडे, पिंपरी, भोसरी अशा अनेक औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात रोजगाराच्या मोठ्या संधी देणारा प्रकल्प अस्तित्वात नाही. म्हणून हा प्रकल्प आपल्याकडे व्हावा असा माझा प्रयत्न आहे. त्यात मला नक्की यश येईल.

पुण्याच्या दक्षिण भागात पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आळंदी- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय बाजार असे प्रकल्प नियोजित आहेत. यापैकी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे, तर विमानतळाची अधिसूचना लवकरच निघणार आहे. राष्ट्रीय बाजारासाठी जागेची मोजणी होऊन हद्दनिश्चिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पांमुळे महिंद्रा कंपनीला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा इथे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महिंद्राचा प्रकल्प याच तीनपैकी कुठल्याही एका तालुक्यात व्हावा अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या तिघांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून मी त्यासाठी भविष्यात देखील पाठपुरावा करणार आहे असेही शिवतारे यांनी सांगितले

महिंद्रा प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

१. १० हजार कोटींची गुंतवणूक

२. प्रकल्पासाठी शेकडो एकर जमिनीची आवश्यकता

३. हजारो युवकांना मिळणार रोजगार

४. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीक्षेत्रात क्रांतिकारक संशोधन व प्रगती होणार

५. चाकण ऑटोहब प्रमाणे दक्षिण भागात ईव्ही हबसाठी शिवतारेंचा पुढाकार

महिंद्रा शंभरपेक्षा जास्त देशात कार्यरत

१९४५ मध्ये स्थापन झालेला महिंद्रा समूह हा १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. २,६०,००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेली ही कंपनी मोठ्या बहुराष्ट्रीय समूहांपैकी एक आहे. भारतातील कृषी उपकरणे, वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये ती आघाडीवर आहे, त्याच बरोबर जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news