इंदापूर: राष्ट्रवादीचे सरकार हे शरद पवार यांचे दिवा स्वप्नच, माजी मंत्री विजय शिवतारे यांची टीका

इंदापूर: राष्ट्रवादीचे सरकार हे शरद पवार यांचे दिवा स्वप्नच, माजी मंत्री विजय शिवतारे यांची टीका

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: शरद पवार 1978 पासून राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याचे राष्ट्रवादीचे दिवा स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असा टोला माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लगावला आहे. राज्यात असणारे भाजप शिंदे गटाचे सरकार हे केव्हाही कोसळेल आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येतयं. या प्रश्नावर उत्तर देताना, शिवतारे म्हणाले, विरोधक हे दिवा स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून शरद पवार हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकलेले नाहीत त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापी पूर्ण होणार नाही.

मागील अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडीच्या चुकीच्या सरकारमुळे जनतेचे नुकसान झाले. कर्म धर्म संयोगाने आणि जनतेच्या आशीर्वादाने गेल्या तीन महिन्यापूर्वी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कठोर विचारांचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार चालवत आहेत. त्याच पध्दतीने स्थानिक पातळीवर सुध्दा भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा समन्वय घडावा आणि कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, यासाठी शनिवारी मी इंदापूर आणि बारामती दौऱ्यावर आलो असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले

शिवतारे यांनी इंदापूर दौऱ्यात भाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंदापूर शहराध्यक्ष शकिल सय्यद, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक शेखर पाटील, हिराचंद काळे यांसह भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात पवारांनी दुसरी शक्ती मोठी होऊ दिली नाही. त्यामुळेच आम्ही भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी एका विचारांची मंडळी एकत्रित येऊन लढलो तर बारामती लोकसभा मतदारसंघाचे वेगळे चित्र दिसेल असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसची बरीच मंडळी ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवतारे यांनी केला. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बारामती लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद निर्माण केली जाईल आणि त्यातून निकालच दिसेल असा आत्मविश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला.

शिवतारे म्हणाले, महाकाय शक्तीच्या विरोधात लोक एकत्र आल्यावर काय घडू शकते हे स.का पाटलांच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस, राहुल गांधींच्या विरोधात स्मृती इराणी आणि मावळात पार्थ पवारांच्या विरोधात श्रीरंग बारणे यांच्या निकालातून जनतेने पाहिले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सकारात्मक विचारांची आम्ही लोकं एकत्र येऊन असा बदल घडवू की ज्याने पुणे जिल्ह्याचे राजकारण बदलेल व महाराष्ट्रात प्रचंड मोठा राजकिय इतिहास घडेल
पहाटेच्या शपथविधीला घर उध्वस्त करुनच गेला होतात

ज्या घरात आपण वाढलो ते घर उध्वस्त करणं म्हणजे बेईमानी आहे असा निशाणा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर साधला होता. त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारेंनी आक्रमक शब्दात उत्तर दिलयं. जे बेइमानी केली आहे असं म्हणतात त्यांना बोलण्याचा अधिकारचं नाही. पहाटेच्या शपथविधीला गेलात ते घर उध्वस्त करुन गेला होतात ते योग्य होते का? असे म्हणत या माणसाला त्यांच्या काकांनी शिवतिर्थावर शपथ घेऊ दिली नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना लगावला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news