पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एकाच सामन्यात दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. ऋतुराजने 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी साकारली ज्यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. एवढेच नाही तर त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या एका षटकात 7 षटकार ठोकून 43 धावा वसूल केल्या. एक चेंडू नो बॉल असल्याने ऋतुराजने त्यावरही षटकार ठोकला आणि न भुतो न भविष्यती असा क्रिकेटच्या जगतातील विक्रम रचला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138.36 होता. शेवटच्या दोन षटकात त्याने 9 षटकार मारले.
हे सर्व घडले महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या षटकात. ऋतुराजने शिवा सिंहच्या गोलंदाजावर घणाघाती प्रहार केला. या षटकात ऋतुराजने सलग 4 चेंडूत 4 षटकार ठोकले. पाचवा चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्यानंतरच्या फ्री हिट आणि शेवटच्या चेंडूवरही ऋतुराजने षटकार खेचून वर्ल्ड रेकॉर्ड केला. या षटकात षटकारांच्या माध्यमातून 42 तर 1 अतिरिक्त धावही मिळाली.
ऋतुराजने आपल्या वादळी फलंदाजीने दहशत निर्माण केली ज्याने गोलंदाज पूर्णपणे हादरल्याचे दिसले. अखेर ऋतुराजच्या द्विशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने पहिला फलंदाजी करून 50 षटकांत 5 गडी गमावून 330 धावांचा डोंगर रचला. यूपीविरुद्ध दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या आणि धावगतीही संथ होती. अखेर ऋतुराजची बॅट तळपली. या सामन्यात महाराष्ट्र संघाने विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात आतापर्यंत फक्त दोनच सामने खेळला होता. एका सामन्यात त्याने शतक (नाबाद 124) केले आणि एका सामन्यात 40 धावा केल्या.