Vijay Diwas : जय हिंद !

Vijay Diwas : जय हिंद !

'युद्धस्यः कथा रम्यः' असे कितीही म्हटले, तरी युद्धाच्या कथा रम्य नसतात. युद्धाच्या असल्याच तर व्यथा असतात; पण भारतीय लष्कराने लढलेले एक युद्ध असे आहे की, त्याचा शेवट रम्य झाला होता. त्यातही हे महत्त्वाचे की, भारताने ते युद्ध भारतीय भूमीसाठी लढलेले नव्हते, तर मानवी हक्‍कांची पायमल्ली करून, जो वंशविच्छेद शेजारच्या देशात चालला होता, तो रोखण्यासाठी लढलेले ते युद्ध होते. ते युद्ध म्हणजे भारत-पाकिस्तानमधला 1971 बांगला देश मुक्‍तीसंग्राम ( Vijay Diwas 2021 ) . आज त्या मुक्‍तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सव. बरोबर 50 वर्षांपूर्वी 91 हजार पाक सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले. पाकिस्तानी जनरल अमीर अब्दुल ऊर्फ ए. ए. खान नियाझी याने भारतीय लष्करी अधिकार्‍यांसमोर शरणागती करारावर सह्या केल्या आणि तोपर्यंत पूर्व पाकिस्तान या नावे ओळखला जाणारा पाकिस्तानचा पूर्वेकडचा प्रांत पाकिस्तानपासून अलग होऊन स्वतंत्र बांगला देश बनला! आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या सैन्याने शेजार्‍यांच्या म्हणजे बांगला देशींच्या मदतीला धावून जात त्यांना मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय, हा खरे तर दुग्धशर्करा योग. 'वसुधैव कुटुंबकम्' अर्थात् हे विश्‍वची माझे घर ही संकल्पना अंगी बाणवलेल्या आपल्या देशाने शेजार्‍यांच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहून विजय मिळवणे हे इतिहासातलेही दुर्मीळ उदाहरण. देशांच्या भौगोलिक सीमांपेक्षा मानवी हक्‍क महत्त्वाचे आहेत, हे जगाला फक्‍तच शब्दांनी न सांगता त्या हक्‍कांसाठी स्वतःचे रक्‍त सांडणार्‍या आपल्या कणखर धोरणाचा आणि ते धोरण मूर्त स्वरूपात आणणार्‍या आपल्या लष्कराचा म्हणूनच गौरव झाला पाहिजे. तसा तो होतोही आहे. गेले वर्षभर दिल्लीतल्या अमर जवान स्मारकापासून निघालेली ज्योत आपल्या लष्कराची जी वेगवेगळी बटालियन्स आहेत, त्या बटालियन्सच्या मुख्यालयांना भेट देत आहे आणि त्यानिमित्ताने बांगला मुक्‍ती लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या, सहभागी झालेल्या यौद्ध्यांचा सन्मान केला जात आहे. सध्या भारत-चीन वादाने पुन्हा उचल खाल्लेली असताना लष्कराचे मनोबल आणि देशवासीयांची लष्कराप्रती आत्मियता वाढवण्यासाठी हा दिवस सहायक ठरेल. दि. 16 डिसेंबर 1971 रोजी प्रत्यक्ष युद्धबंदी होऊन पाक लष्कराने शरणागती पत्करली ( Vijay Diwas 2021 ). हा इतिहास ज्ञात आहेच; पण फक्‍त 13 दिवसांत आपल्या लष्कराने हे साध्य केले, हा अजोड पराक्रम आहे. मात्र, त्याचे तितकेसे स्मरण नाही. पाकिस्तानाच भाग राहिलेल्या बांगला देशाची तेव्हाची लोकसंख्या मूळ पाकिस्तानपेक्षा जास्त होती, हाही विस्मृतीत गेलेला इतिहास. मुळात बांगला देशाच्या अलगीकरणाची मुळे भाषेच्या वादातून पेरली गेली होती; पण ते केले गेले पाहिजे. कारण, सात कोटी बांगला देशी जनतेची रोजच्या व्यवहाराची भाषा बंगाली असताना त्यांच्यावर उर्दू लादली गेली.

( Vijay Diwas 2021 ) बरे, उर्दूसुद्धा मूळ पाकिस्तानातले केवळ 5 टक्केच लोक बोलत होते. बहुतांश पाक जनतेची भाषा पंजाबी होती, तरीही अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती होताच मोहम्मद अली जिनांनी उर्दू ही राष्ट्रभाषा घोषित केली आणि बंगाली भाषेला भाषा मानण्यासही नकार दिला. लोकसंस्कृती बदलायची असेल, तर आधी लोकांच्या भाषेवर घाला घाला, असे इतिहास सांगतो. पाक प्रशासनाने तेच केले. खरे तर बंगालींचा उर्दूला थेट विरोध नव्हता. बंगाली ही पाकची द्वितीय भाषा असावी, इतकीच बंगाली जनतेची मागणी होती; पण तीही मान्य झाली नाही. उलट तशी मागणी करणार्‍यांचे खूनसत्र सुरू झाले. त्याला प्रतिकार म्हणून मुक्‍ती वाहिनी सुरू झाली. ती इतकी प्रबळ बनली की, इस्लामाबादेतल्या राज्यकर्त्यांना स्वतःची खुर्ची डळमळीत झाल्याचा भास होऊ लागला आणि मग सुरू झाले ते बांगला देशींचे नृशंस हत्याकांड. 26 मार्च 1971 हा तो दिवस, जेव्हा पाक लष्कराने स्वतंत्र बांगला देशचा पुरस्कार करणारे नेते, लेखक, विचारवंत आणि आम जनतेचीही कत्तल सुरू केली. या कत्तलखोर पाक लष्कराला मदत होती ती जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेची. 2 ते 3 लाख लोकांची हत्या, 2 ते 4 लाख महिलांवर बलात्कार, तब्बल 10 लाख निराश्रित आणि त्यांची भारतात धाव हा सगळा घटनाक्रम पाक राज्यकर्त्यांची असुरी वृत्तीच दाखवत होता. त्यातच उर्दू बोलणार्‍या सुमारे दीड लाख बिहारी लोकांची बांगला देशात हत्या झाली. ती बंगाली भाषा पुरस्कर्त्यांनी घडवून आणली, असे मानले जाते. म्हणजेच उर्दू विरुद्ध बंगाली हा संघर्ष इतक्या पराकोटीला पोहोचला होता. त्यामुळे भारताला मध्ये पडावेच लागणार होते आणि मध्ये पडताच केवळ 13 दिवसांत भारताने पाकला नाक घासण्यास भाग पाडले. त्यातही पाकची नाचक्‍की अशी की, पराभव समोर दिसताच नियाझीने शरणागती पत्करण्याची तयारी दर्शवली; पण हे सारे गुपचूपपणे व्हावे, अशी त्याची इच्छा होती; पण आपल्या लष्करी अधिकार्‍यांनी जीवदान पाहिजे असेल, तर अधिकृतपणे रेडिओवरून शरणागतीची घोषणा करूनच युद्धबंदी होईल, असे स्पष्ट केले. शत्रूचे मनोबल खच्ची करण्याची ही खेळी होती. ती यशस्वी ठरली. भारतापासून वेगळे झालेल्या पाकिस्तानला त्यांचा अर्धा देश राखता आला नाही, ही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना मोठी चपराक होतीच. कारण, त्यानंतर सुमारे 30 वर्षे म्हणजे कारगिल युद्धापर्यंत पाक लष्कराने थेट आगळीक केली नव्हती. 1999 मध्ये ती केली. त्यावेळीही पाकला पराभूतच व्हावे लागले. हा लढा विस्तारवादी नव्हताच. बांगला देशींच्या स्वातंत्र्य, हक्‍कांचे रक्षण आणि सन्मान करणारा होता. मानवातावादी धोरणातून दिलेल्या या लढ्याची, विजयाची आणि त्यासाठी गाजवलेल्या पराक्रमाची महती म्हणूनच वाढते. जय जवान, जय हिंद!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news